पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिच्या शेजारी राहणाऱ्या शिवरामपंत नावाच्या एका विचारी, सुशिक्षित, उदार अशा गृहस्थाचा सहवास तिच्या भावाप्रमाणेच तिला लाभला होता. शिवरामपंत हे आगरकरांच्या सुधारक पंथातले होते. आणि त्या काळी जे भयंकर पाप मानले गेले होते ते कृत्य आपली मुलगी सुंदरी हिला शिक्षण देण्याचे ते करीत होती. सुंदरीच्या मैत्रीमुळे ताई त्यांच्याकडे जाऊ लागली, लिहावाचायला शिकली आणि त्यांच्या तोंडून नित्य निघणाऱ्या उद्गारांतून काही नवे विचार तिच्या कानावरून गेले. ती मुळात अतिशय बुद्धिमान होती, आईचा करारी स्वभाव तिच्यातही उतरला होता, तिचा भाऊही शिवरामपंताचा शिष्य झाल्यामुळे त्याच्याकडूनही काही क्रांतिकारक मते तिने ऐकली होती त्यामुळे प्रारंभी जरी ती गरीब गाय होती, तिच्या आईने अट्टाहासाने तिला कसायाला दिली होती. तरी मानेवर सुरी पडायची वेळ आली तेव्हा दावे ताडकन तोडून निघून जाण्याचे बळ व धैर्य तिच्या ठायी निर्माण झाले. नव्या विचाराने स्त्री थोडी जागृत होते व तिला असे बळ येते हेच हरिभाऊंना दाखवावयाचे आहे. हेच त्यांचे स्त्रीजीवनावरचे भाष्य आहे.
 व्यक्तित्व स्वतंत्रविचार करण्याचे सामर्थ्यं बुद्धिप्रामाण्य हे मानवाच्या सर्व सामर्थ्याचं उगमस्थान आहे. ब्रिटिश येथे येण्यापूर्वीच्या हजार वर्षाच्या काळात धार्मिक, सामाजिक व राजकीय शृंखलांनी, सावरकरांनी सांगितलेल्या सप्त शृंखलांनी भारतात त्यांचा संपूर्ण कोंडमारा झाला होता. येथले पुरूषही व्यक्तित्व शून्य, पराधीन दुबळे, धैर्यहीन असे झाले होते. मग स्त्रिया तशा झाल्या असल्यास नवल नाही. पाश्चात्य विचारांनी, बुद्धिप्रामाण्यवादी भौतिक विद्येने येथल्या समाजात सुशिक्षित वर्गात ते व्यक्तित्व जागे होऊ लागले व क्रमाने त्या विद्येचे संस्कार स्त्रियांवरही होऊन त्यांचीही मनःक्रान्ती होऊ लागली. हरिभाऊंच्या कादंबऱ्या म्हणजे या क्रान्तीचा चित्रपट आहे. या परिवर्तनाच्या लहान मोठया, स्पष्ट अस्पष्ट सर्व छटा त्यांनी मोठया कुशलतेने आपल्या साहित्यात दाखविल्या आहेत.
 स्वतः सिद्धता नको यमूचे आजोबा आजारी होते. तिची आजी औषधपाणी करीत होती. पण औषधे फेकून देऊन ते गमतीने म्हणत 'हिला वाटतं, मी मरायला टेकलो आहे. स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे वाटतं तुला एकदा! पण हे बघ, मी मरायचा नाही न् तुला स्वतः सिद्ध होऊ द्यायचा नाही ! तुमच्या डोळ्यांदेखत एकदा माझा शेवट होऊ द्या. दुसरी काही इच्छा नाही.' हे संभाषण काहीशा विनोदाने चालले होते. पण त्यातील भावार्थ स्पष्ट आहे. नवरा आहे तोपर्यंत स्त्री स्वतः सिद्ध होणे शक्य नाही, मागून वाटले तर तिने व्हावे. पण स्त्रीला स्वतःलाच ती इच्छा नाही, स्वतः सिद्ध होण्याची तिची इच्छा आहे असे म्हणणे हा तिला स्वतःवर गहजब वाटतो.
 व्यक्तित्व दुःसह यमुना मुंबईस रहावयास गेली. तेथे विष्णुपंत-लक्ष्मीबाई आणि नानासाहेब- यशोदाबाई अशी दोन जोडपी होती. रघुनाथराव व ते सर्व लोक रात्री जेवणे झाल्यावर एकत्र गप्पा मारीत बसत. यमू तेथे गेल्यावर तिला हे कळले

स्त्री जीवनभाष्य
९३