पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उच्छाद मांडला आहे.' म्हातारपणामुळे माणसांचें मन मृदु होते, त्याला चटकन कणव येते, असे म्हणतात. पण हिंदुधर्माला हे मंजूर नाही. स्त्रियांच्याही बाबतीत नाही. यमुनेची आजेसासू, मामेसासू इतर शेजारपाजारच्या बाया दया, कणव, मृदुता हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता. कारण यमुना विधवा झाली होती आणि तिने वपन केले नव्हते.
 अधर्म शंकर मामंजीनी शेवटी जबरदस्तीने ते धर्मकृत्य घडवून आणले व कुळाचा कलंक नाहीसा केला. त्यांची बायको वारली होती. तेव्हा म्हातारपणी त्यांनी तेराचदा वर्षाच्या एका मुलींशी लग्न केले. आता तिचे गर्भाधान व्हावयाचे होते. पण त्याच्या घराण्यातली एक विधवा वपनाशिवाय राहिली होती. म्हणून ब्राह्मण त्या धर्म कृत्याला येईनात. शंकर मामंजी बाहेरख्याली होते, एकदा घरातही त्यांनी एक बाई आणली होती. पण त्यामुळे या घरावर बहिष्कार टाकावा, असे ब्राह्मणांना कधीच वाटले नव्हते. पण त्या घरातली एक सून वपनाशिवाय राहिली होती, हा अधर्म त्यांना फार भयंकर वाटत होता. तरी यमुना माहेरी होती. त्या घरात नव्हती. पण कोठेही असली तरी तो कुळाला कलंकच होता. त्यामुळे ब्राह्मणानी शंकर मामंजीच्या घरावर बहिष्कार टाकला. तेव्हा यमुनेला सासरी बोलावून फसवून एका खोलीत नेऊन जबरदस्तीने शंकरमामंजींनी न्हाव्याकडून तिला सोवळी करून टाकली. अर्थातच या पुण्यवान कृत्यामुळे ते घर, ते कुळ पावन झाले, ब्राह्मण धावत आले.
 नवे संस्कार  'मी' कादंबरीतील भाऊरावांची बहीण ताई हिची स्थिती प्रारंभी यमुनेसारखीच होती. यमुनेला एकदा आपल्याला म्हाताऱ्याला देणार अशी नुसती भीती वाटली होती. ताईला म्हाताऱ्याला दिलीच होती. त्याच प्रसंगी असहायपणे ती भावाला म्हणाली होती की, 'बाबारे आम्ही घरात बांधलेली मुकी जनावरे ! कोणी मारलं मार खाल्ला पाहिजे. जा म्हटलं गेलं पाहिजे, नको म्हटलं थबकलं पाहिजे.' तिचे त्या म्हाताऱ्याशी लग्न लागले त्याचे वर्णन, 'भटांच्या शुभ-मंगलसावधानच्या गजरात आमच्या ताईचे बलिदान झाले,' असे भाऊने म्हणजे हरिभाऊंनी केले आहे. ताईचा नवरा जुन्या सरदार घराण्यातला होता. तो म्हातारा होता. बाजारबसव्यांना घरी आणून ताईला त्याची सेवा करायला लावीत होता. त्यामुळे एरवी असहाय, दीन, अशा स्त्रियाप्रमाणेच, दुर्गा, शंकरमामंजीची बायको उमाबाई यांच्याप्रमाणेच, तिचेही चरित्र व्हावयाचे. पण तिच्या या चरित्रात इतर स्त्रियांपेक्षा एक निराळा घटक निर्माण झाला होता. त्या नित्याच्या रसायनात एक निराळे द्रव्य येऊन पडले होते. त्यामुळे तिचे चरित्र अगदी निराळे झाले. सामान्य महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्रीच्यापेक्षा अगदी निराळ्या चाकोरीतून तिचा जीवनरथ चालू लागला. हा निराळा घटक कोणता ? तोच हरिभाऊंच्या कादंबरीचा विषय आहे. तेच त्यांचे प्रतिपाद्य आहे.
 जागृत स्त्री  ताईच्या ठायी थोडा, अगदी थोडा व्यक्तित्वाचा उदय झाला होता.

९२
साहित्यातील जीवनभाष्य