पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अतिशय घाबरून गेली व 'मला मारू नका' म्हणून, केविलवाण्या स्वरातः त्यांना विनवू लागली.
 वैधव्य हिंदुसंस्कृती आणि तिची ती विवाहसंस्था यावर यापेक्षा कडवट टीका ती काय असणार ! प्रत्यक्ष विवेचन करून हरिभाऊंनी स्त्रीजीवनावर भाष्य केलेच आहे. पण अशा प्रसंगांतून त्याचे अत्यंत उद्बोधक दर्शन घडविले आहे. यमुनेला वैधव्य आल्यानंतर तिची जी स्थिती झाली व तिच्यावर जे विपरीत प्रसंग आले त्यांचे जे हरिभाऊंनी वर्णन केले आहे ते म्हणजे आगरकरांनी 'हिंदुधर्म हा अत्यंत बीभत्स, अमंगल, ओंगळ आहे' अशी जी टीका केली आहे. तिला दिलेले मूर्त रूपच होय. विधवा झालेली स्त्री म्हणजे करुणमूर्तीच होय. दया, सहानुभूती, आपुलकी, प्रेम, स्नेह यांनी तिचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणं हाच खरा धर्म होय. तशी तत्त्वे हिंदुधर्मात सांगितलेलीही आहेत. पण अत्यंज, शूद्र, स्त्रिया यांचा संबंध आला की, हा धर्म रानटाहून रानटी, क्रूराहून क्रूर, असा होतो. दया, क्षमा, शांती, सर्वाभूती एक आत्मा ही तत्त्वे तो जाणीत नाही, माणुसकीची त्याला आठवण रहात नाही, औदार्य, उदात्तता, करूणा हे शब्दही त्याला सहन होत नाहीत. यमुनेने एके ठिकाणी म्हटले आहे की, 'आम्ही गरीब गाई, कसायाच्या हाती दिल्या. तरी काय करणार ?' पण राक्षसी रूढीच्या वर्चस्वाखाली असलेल्या यमुनेच्या आप्त स्त्रीपुरुषांनी, सनातन धर्ममार्तडानी कसाई बरे, असे म्हणण्याची पाळी आणली. रघुनाथराव जाऊन चार दिवस झाले नाहीत तो शंकरमामंजीनी त्यांच्या पेट्या ट्रंका उघडून घरातले दागिने तर गडप केलेच पण 'तू जनरीतीप्रमाणे सगळ करून घे' (वपन करून घे) असाही भुंगा तिच्या मागे लावला. 'जिवंतपणी त्याच्याकडून पापं करविलीस तेवढी थोडी नाही झाली ? आमच्या कुळाला डाग लावू नको अशा डागण्या तो नरपशू त्या स्थितीतही तिला देऊ लागला. पण विधवा स्त्रीला डागण्या देण्यास नरपशूच लागतो असे नाही. त्यावेळी सर्वच नरपशू झालेले असतात. स्त्रियाही यावेळी पुरुषांच्या मागे रहात नाहीत. 'माझे पुढले चरित्र म्हणजे नरक यातनापेक्षाही जास्त अशा यातना आहेत,' असे यमुना म्हणाली ते यामुळेच. सर्वांनी विशेषतः बायकांनी तिला असे शब्द ऐकविले की, तिच्या काळजाला घरे पडावी. 'बायको आहे की नाही टवळी, तो कुठली मरायला ? अहो, पाप, पाप ते काही दूर आहे का ? हेच पाप !' यमुना सासरी गेली तेव्हा ती रडतच होती. तेव्हा बनुवन्सं म्हणाल्या, 'हे ग काय हे, आमच्या भरल्या घरात तीन्ही सांजा रडतेस काय अवदसे सारखी ? तुझं कपाळ फुटलं म्हणून आमच्या घरात का त्रास?' यमुनेची सासू दुःखामुळे अंथरूण धरूनच होती. तिने पाणी मागितले ते यमुनेने दिले. तेव्हा भयंकर गहजब झाला. वपन न केलेल्या बाईच्या हातचे पाणी एका सोवळ्या बाईच्या मुखात ! आजे सासूबाई कडाडल्या, 'डोक्यावर ठेवलेल्या भाराचं एकदा निसंतान कर अन मग आमच्या घरात कारभार कर. अवदसेनं नुसता

स्त्री जीवनभाष्य
९१