पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बायकोला तिची बडदास्त ठेवायला लावले.
 यमू म्हणते, "त्या शब्दात उमासासूबाईनी आपल्या सर्व आयुष्याच्या अनुभवाचे सार कोंडून ठेविले होते. मला वाटते. असे शब्द उच्चारले जावोत न जात, परंतु असा विचार किती तरी स्त्रियांच्या मनात येत असेल. त्यातून उमा सासूबाईच्या स्थितीसारख्या स्थितीत असणाऱ्या स्त्रियांना तर मरणे म्हणजे यातनांतून असे वाटत असेल यात शंकाच नाही."
 गुरांचा बाजार यमू सात आठ वर्षाची झाली तेव्हा तिला पहायला येण्यास सुरवात झाली. यमूने स्वतःच या पाहण्याचे वर्णन केले आहे. चालायला सांगतात, श्रावायला सांगतात, तोंड उघडून जीभ पाहतात. हे सर्व प्रकार सांगून ती म्हणते, 'गुरांच्या बाजारात कसाई लोक मेंढरी बकरी घेतात त्यावेळी त्यांची कशी परीक्षा करतात ते मला ठाऊक नाही. पण मी जे ऐकले आहे त्यावरून मला वाटते की; आम्हा मुलींना पहायला येणारी मंडळी आमची जी परीक्षा करतात ती अगदी त्याच मासल्याची असली पाहिजे. अंतर एवढेच की त्या गुरांना कळत नसते आणि आम्हा मुलांना कळत असते.' दुर्गाला पतीच्या हातचा नेहमी मार खावा लागे. ते ऐकून यमूच्या पोटात घस्त होई. आपल्याही कपाळी हेच येणार काय ? लग्न होऊन ती सासरी गेली होती पण अजून तिचा पतीशी ओळख झाली नव्हती. तरी तिला असे वाटे की, आपल्या नशिबी बहुधा तसे दुःख नाही. दुरून होणाऱ्या दर्शनावरून तिने हा अदमास बांधला होता. पण या सुखद अदमासाविषयी लिहितानाही तिने स्त्रीजीवनाविषयी किती कडवटपणे लिहिले आहे पहा. ती म्हणते, 'असे म्हणण्याचे कारण मला सांगता येणार नाही. त्याला आमच्या जन्मास येऊन आमच्या स्थितीतच असले पाहिजे. पाळीव जनावराला आपल्या धन्याच्या मर्जीच्या निरनिराळ्या अवस्था जशा उपजत बुद्धीनेच समजतात त्याचप्रमाणे आमची स्थिती आहे. जसे एखाद्यास एखादे कुत्रे बाळगायचे असले म्हणजे तो लहानपणीच पिल्लू घरात आणून ठेवतो तशी हुबेहूब आमची स्थिती आहे. कुत्र्याला मायेने तरी वागवितात येथे त्यावाचून सारे ठीक असते. अमुक आपला धनी म्हणून त्याच्या पुढे पुढे करण्यास व त्याची मर्जी संभाळण्यास शिकविले जाते, तसेच आम्हाला शिकविले जाते.
 पती ? एकंदर पतीविषयी अशी धारणा असल्यामुळे व दुर्गाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे, एका चमत्कारिक प्रसंगी यमुनेला आपले पती रघुनाथराव आपल्याला मारण्यासाठीच आले आहेत असेच वाटले. घरात तिची काही चूक नसताना एक दिवस तिला फार बोलणी बसली. त्या जुन्या काळच्या पद्धतीप्रमाणे तिच्या आईबापांचाही उद्धार झाला. त्यामुळे एका अंधाऱ्या खोलीत जाऊन ती रडत बसली होती. रघुनाथरावांनी ते पाहिले. तिची काही चूक नाही हे त्यांना माहीत होते. म्हणून कोणाला नकळत ते तिची समजूत घालावी, दोन गोड शब्द बोलून तिला धीर द्यावा, या बुद्धीने त्या खोलीत गेले. पण त्यांना पाहताच ती

९०
साहित्यातील जीवनभाष्य