पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे घडणे अशक्य होते. आणि आजही जवळजवळ अशक्यच आहे. हे सर्व मनात येऊन भारतीय स्त्रीचे जीवन गेल्या शतकातल्या युरोपीय स्त्रीच्या जीवनापेक्षा शतपटीने, अनंतपटीने जास्त दुःसह होते, यातनामय होते याविषयी शंका रहात नाही. याच जीवनाचे हरिभाऊंनी वर्णन केले आहे.
 सुख केव्हा लागेल ?  यमूची मैत्रिण दुर्गी हिला जीवन असह्य झाले होते. नवरा उनाड होता. त्याने शाळा कधीच सोडून दिली होती. दोन पैसे मिळवण्याचीही अक्कल त्याला नव्हती. दोन वेळा जेवायला मात्र तो हक्काने घरी येत असे. आईला वाटेल ते बोलत असे आणि दुर्गाला मारझोड करीत असे. त्यातच तिला दिवस गेलेले. दोन वेळच्या अन्नालाही ती महाग झाली होती. बाळंतपणासाठी आईने तिला माहेरी आणली होती. पण ते तिच्या नवऱ्याला आवडले नव्हते. ती माणसे आपल्या श्रीमंतीचा गर्व दाखवितात, असे त्याला वाटत होते. म्हणून तो रोज तिच्या माहेरी जाऊन अद्वातद्वा बोलत असे, भांडत असे. 'तू घरी चल इथे माहेरी राहायचं नाही, यांचं मला तोंड पाहायचं नाही,' हाच त्याचा घोशा. एक दिवस तर तो तिला ओढीत नेऊ लागला. आणि तिच्या आईने जरा जोरात विरोध केला तेव्हा तो शिव्या देत निघून गेला. यामुळे दुर्गी कंटाळून गेली होती. यमू तिला धीराचे दोन शब्द सांगू लागली तेव्हा अत्यंत उद्वेगाने ती म्हणाली, "यमे, तुला सांगू मला केव्हा सुख लागेल ते ? हे बघ, एक मी तरी मेले पाहिजे, नाहीतर तिकडे तरी काही बरं वाईट झालं पाहिजे. त्याच्याखेरीज काही या हालांतून सुटका नाही. मी या बाळंतपणात मेले तर बरी, नाहीतर काहीना काही तरी आपल्या जिवाला करून घेईन."
 यमूला तिचे ते शब्द भयंकर वाटले. पण थोडावेळाने ती मनात म्हणाली, 'आजपर्यंतच्या छळाने अगदी त्रासलेली, जाचाने गांजलेली, दुःखाने भाजलेली, शिव्यांनी डागलेली अशी ती मुलगी संतापाच्या भरात तसे बोलली तर त्यात नवल काय ? सध्याच्या यातनापेक्षा वैधव्याच्या नरक यातना बऱ्या वाटाव्या अशीच तिची स्थिती होती.'
 सुटले मी ! यमुनेचे सासरे शंकर मामंजी यांची बायको उमाबाई ही अशीच गांजलेली स्त्री होती. नवऱ्याच्या शिव्याशापांना साऱ्या जन्मात तिला प्रत्त्युत्तर करता आले नव्हते. ते शक्यच नव्हते. पण ते मरताना तिने केले. अर्धवट बेशुद्धीतच ती म्हणाली, 'एक जन्म होते तुमच्या पदरी. सुटले बरं आता. खुशाल असा.' शंकर मामंजी हा नरपशूच होता. आजारीपणामुळे नुसते पूजेचे करायला उशीर झाला तरी तो तिच्या अंगावर धावून जात असे. वाटेल तशा शिव्या देत असे. मुलांना बोलायचाही तिला अधिकार नव्हता. तिला उलटून बोलायला तो मुलांना चिथावून देत असे. त्यामुळे ती पोरटीही तिला वाटेल ते बोलत. बाहेरख्यालीपणा त्याचा नित्याचाच होता. पण एकदा त्या बाईला त्याने घरी आणून

स्त्री जीवनभाष्य
८९