पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तम दर्शन प्रारंभीच्या भागात त्याने घडविले आहे. त्याचबरोबर थोर जीवन भाष्याचा एक महत्त्वाचा निकष सांगता यावा, त्याविषयी चर्चा करावी हाही एक हेतू त्यात होताच.
 ३ भारतीय स्त्री हरिभाऊंनी आपल्या 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या कादंबऱ्यांत महाराष्ट्रतल्या ब्राह्मण स्त्रीच्या जीवनाचे वर्णन केले आहे. हरिभाऊंच्या सर्व सामाजिक कादंबऱ्यांचा हाच विषय आहे. पण साहित्य कलेच्या व जीवन भाष्याच्या दृष्टीने या दोन कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत हे महाराष्ट्रात सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे येथे त्याच दोन कादंबऱ्यांची निवड केली आहे. इब्सेनचे 'डॉल्स हाऊस' व हार्डीची 'टेस' या ललितकृतीत पाश्चात्य समाजातील गेल्या शतकातल्या स्त्रीच्या जीवनाचे दर्शन घडते. तेथेही गेल्या शतकात स्त्री ही पराधीन होती, तिचे जिणे एखाद्या बाहुलीसारखे होते, पुरुषांच्या सुखासाठीच तिचा जन्म, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही, अशा समजुती रूढ होत्या व पुरुषांची वागणूकही तशीच होती. स्त्री पुरुषांच्या विषयीची नीती पराकाष्ठेची भिन्न होती. शीलभ्रष्ट, व्यभिचारी पुरुष हा सहीसलामत मोकळा सुटणे व स्त्रीला मात्र अनिच्छेने घडलेल्या पातकाबद्दलही घोर प्रायश्चित्त भोगावे लागणे हा प्रकार नित्याचाच होता. असे असूनही युरोपीय स्त्रीकडून भारताकडे वळलो व महाराष्ट्रीय स्त्रीचे जीवन पाहू लागलो म्हणजे युरोपातली विषमता तेथला अन्याय, तेथल्या क्रूर रुढी, तेथला छळवादी सनातन समाज आणि या सर्वामुळे स्त्रीला सोसाव्या लागणाऱ्या यातना या भारतीय स्त्रीच्या यातनांच्या तुलनेने काहीच नव्हेत असे वाटू लागते. नोरा ही, 'माझ्या जीवनाचा मला स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे,' असे शांतपणे पतीला सांगून घरातून बाहेर पडते. आणि तिने असे करू नये अशा, तिचा पती तिच्या विनवण्या करतो. भारतात असे दृश्य केव्हाच दिसले नसते. अगोदर संकट टळून पतीने, आपला राग गेला, असे सांगितल्यावर भारतातली स्त्री आनंदाने घरात राहिली असती. घर सोडून जाण्याचा विचार तिच्या स्वप्नातही आला नसता. नोराचा गृहत्याग हा केवळ तात्विक भूमिकेने केलेला होता. अशी तात्विक भूमिका घेण्याइतकी उंची भारतीय स्त्रीला गेल्या शतकात आलेलीच नव्हती. भाऊरावांची बहीण ताई हिने पतीचे घर सोडले होते. पण ते केवळ यातना असह्य झाल्या म्हणून. पतीचा सुनीमच तिचा धनी होऊ लागला म्हणून. पतीच्या वेश्यांची सेवा तिला करावी लागत होती, आणि ती न केल्यास मार खावा लागत होता म्हणून नोराच्या व ताईच्या भूमिकेत जमीन अस्मानाचे अंतर आहे. हार्डीची टेस ही परित्यक्ता होती. पण महाराष्ट्रातली ब्राह्मण परित्यक्ता व ती इंग्लिश परित्यक्ता यांची कोठल्याच दृष्टीने तुलना होणे शक्य नाही. टेस ही कोठेही जाऊन नोकरी करीत होती. आपले भवितव्य ठरविण्याचे स्वातंत्र्य तिला होते. आणि तिच्या मैत्रिणी तिला वाटेल ते साह्य करण्यास तयार होत्या आणि ती कलंकित, भ्रष्ट असूनही तिच्या पतीने तिचा शेवटी स्वीकार केला होता. गेल्या शतकात महाराष्ट्रात

८८
साहित्यातील जीवनभाष्य