पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली आहे. तो म्हणतो, 'जीवनाविषयीचा हार्डीचा हा जो दृष्टिकोन त्यामुळे हार्डीच्या कादंबरीचा एक ठरीव साचा होऊन बसला. दैव व मानव यांचे कायमचे द्वंद्व आणि त्या द्वंद्वात मनुष्याचा अंती निश्चित पराभव, असा हा साचा आहे. आणि हेच त्याचे जीवनाचे भाष्य आहे. त्याने प्रेम वर्णिले आहे ते असेच. प्रेम ही एक आंधळी व दुर्दम अशी शक्ती असून हार्डीच्या सर्व रेखा तिनेच प्रेरित झालेल्या असतात. आणि या आंधळ्या शक्तीने प्रेमी व्यक्तीचा अंती सर्वनाश व्हावयाचा हेही जवळ जवळ ठरलेले आहे. हार्डीच्या सर्व साहित्याच्या पाठीशी हा अंधसिद्धान्त, हे ब्रह्मवाक्य कायमचे दिसते. 'विश्वशक्ती ही क्रूर, हृदयशून्य आहे' या सिद्धान्ताच्या चौकटीत तो प्रत्येक कथा ठोकून बसवितो. त्यामुळे त्याचे कथानक पुष्कळ वेळा प्रतीतीशून्य होतं. याचे सर्वात विदारक उदाहरण म्हणजे 'टेस' हे होय. अलेकचे परिवर्तन त्याने इतके आकस्मिक दाखविले आहे की, त्यावर विश्वासच बसत नाही. हे मुद्दाम जमविले आहे असे वाटते. दर ठिकाणी हार्डी असेच करतो. संभाव्यतेचा तो लवमात्र विचार करीत नाही.'ज्यूड' चा अंत त्याने असाच घडविला आहे. त्याला एक गोष्ट दाखवावयाची आहे की माणूस हा दैवाचा बळी असतो. आणि ते दाखविण्यासाठी तो कथानकाला वाटेल ते वळण देतो, वाटेल ते पिरगळे मारतो. लेखक स्वतःच्या दृष्टिकोनातूनच साहित्यात जग रंगवितो हे खरे. पण त्याचे जग व सत्य जग यांचा समन्वय झाला नाही तर साहित्यात वास्तवता येत नाही. आणि मग वाचकांच्या मनावरची कथेची पकड निसटू लागते. टेसच्या बाबतीत असे फार झाले आहे.
 निकष हार्डी हा जीवनाचा चांगला भाष्यकार आहे असे मला वाटत नाही. मानवी जीवन हे कोठल्या तरी एका चवकटीत बसवता येईल, असे ज्याला वाटते त्याला ते जीवन कळले आहे, असे म्हणता येत नाही. दैव नावाच्या एका क्रूर शक्तीच्या हातचे मनुष्य हे एक खेळणे आहे, असे शेक्सपीयरनेही म्हटले आहे. पण ते जीवनाच्या एका अंगाचे दर्शन झाले. आपल्या अनेक नाटकातून जीवनांची सर्व अंगोपांगे शेक्सपीयरने दाखविली आहेत. म्हणून तो महाकवी झाला. हार्डीला ती पदवी कधीच देता येणार नाही. डेव्हिड सेसिल याने हार्डीच्या कादंबऱ्यातील आणखीही वैगुण्ये दाखविली आहेत. समाजातील वरच्या पातळीवरची माणसे, श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्ती त्याच्या कादंबऱ्यात येतच नाहीत. अगदी सामान्य पातळीवरचा, जीवनक्रमच फक्त तो रंगवितो. त्यामुळे शिल्लक राहिलेले जगच फार मोठे आहे. शिवाय गुंतागुंतीची मिश्र मनोरचना तो उकलू लागला की नक्कीच गोंधळ करतो. ती शक्ती त्याच्या लेखणीला नाही. म्हणजे एकंदरीत पाहता हार्डीने निर्मिलेले विश्व फार लहान आहे, संकुचित आहे, त्याच्या साहित्यात खऱ्या अमर्याद विश्वाचे दर्शन घडतच नाही. तरीही 'टेस' कादंबरीचा या प्रबंधात समावेश केला त्याचे कारण असे की, स्त्रीपुरुष विषमनीती हे जे सामाजिक जीवनाचे जे एक महत्त्वाचे सूत्र त्याचे

स्त्री जीवनभाष्य
८७