पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती संतुष्ट होती. त्या दिव्य प्रेमाचा एक क्षण तिला पुरे होता. तो तिला लाख मोलाचा वाटत होता. आणि त्याच स्थितीत मरण यावे, असे तिला वाटत होते. कारण तिला वाटे, न जाणो पुन्हा काही कारण होऊन एंजल आपल्याला टाकील. म्हणून मरण आले तर बरेच असे ती म्हणे. आणि ते अटळच होते. पाच दिवसांनी पोलिसांनी तिचा माग काढलाच. त्यांना पाहताच एंजलचा निरोप घेऊन ती त्यांच्या स्वाधीनं झाली.
 सत्याचा आधार नाही हार्डीने या कथेचा हा जो विचित्र शेवट केला आहे त्यावर पुष्कळ टीका झाली आहे. अनेक टीकाकारांना या कथेचा उत्तरभाग अवास्तव वाटतो. एंजलला पश्चात्ताप झाला होता व तो परत आलाही होता. टेसने इतके दिवस धीर धरला तसा आणखी सात आठ दिवस धरला असता तर तिचे पतीशी सुखाने मीलन झाले असते. व मध्यंतरीचे वर्ष दीडवर्ष पुढे पूर्ण विस्मृतीत जाऊन त्यांचा संसार सुखाचा झाला असता. पण हार्डीने तसे होऊ दिले नाही. तीन चार दिवसाच्या चुकामुकीने तो सुयोग हुकला आणि टेसचा अत्यंत भयानक शेवट झाला, असे त्याने दाखविले आहे. आतां कोणी असे म्हणेल की यात अवास्तव काय आहे ? दुर्दैवाने असे कधी कधी घडते. थोडक्यात चुकामूक होऊन अनेक वेळा लोकांच्या सर्व आयुष्याचा सत्यनाश होतो. तेव्हा हार्डीने यात विचित्र असे काय केले आहे ? हे म्हणणे खरे आहे. कधी कधी असे घडते, यात शंका नाही. तेव्हा हार्डीने केलेला जो टेसच्या कथानकाचा शेवट त्यावर आक्षेप घेता येणार नाही. हार्डीने या एकाच कथेचा असा शेवट घडविला असे असते तर त्यावर कोणी आक्षेप घेतला नसता. पण हार्डीने त्याचे तत्त्वज्ञान बनविले आहे, त्याचे हे जीवनाचे भाष्यच आहे. आणि ते मात्र आक्षेपार्ह आहे. कारण ते अवास्तव आहे.
 हार्डीचे तत्त्वज्ञानच असे आहे की, दैव आणि मनुष्य या झगड्यात दैव ही अत्यंत क्रूर, निर्दय, आत्मशून्य, हृदयहीन, पण तितकीच समर्थ अशी शक्ती आहे आणि माणूस हा तिच्या हातातले एक खेळणे आहे. मांजर उंदराचा खेळ करते तसा दैव माणसाचा खेळ करीत असते. आणि त्याला त्यात मौज वाटेनाशी झाली की ते शेवटी माणसाला चिरडून फेकून देते. हार्डीने अनेक कादंबऱ्या लिहिल्या; पण त्या सर्वांत या एकाच सिद्धान्ता अन्वये त्याने त्यातील व्यक्तिरेखांची भवितव्ये घडवून टाकली आहेत. माणूस कधी दैवावर मात करतो, दैव दुष्टयोग आणते तसे कधी सुयोगही आणते हे त्याला मान्यच नाही. पण जीवनात, प्रत्यक्ष संसारात हे सर्व प्रकार नित्य घडत असतात. त्यामुळे हार्डीचे हे जे तत्त्वज्ञान आहे त्याला सत्याचा आधार नाही.
 ठरीव साचा डेव्हिड सेसिल या इंग्लिश टीकाकाराने 'हार्डी दि नॉव्हेलिस्ट' या नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला आहे. हार्डीच्या कादंबरी कलेविषयी, त्याच्या प्रतिभेविषयी सेसिलला फार आदर आहे. पण त्याच्या तत्त्वज्ञानावर त्याने परखड टीका

८६
साहित्यातील जीवनभाष्य