पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धनही चालू होते. 'माझ्या घरात तुम्ही सर्व रहा,' असेही तो म्हणाला. तेव्हा टेसचे मन डळमळू लागले. आणि आज इतक्या दिवसांनी तिला एंजलचा राग आला. इतके दिवस तिने त्याला कधी दोष दिला नव्हता. 'मीच तुमच्या योग्यतेची नव्हते, मला प्रायश्चित्त मिळाले ते योग्यच झाले' असे ती म्हणत असे. आता मात्र तिचा धीर सुटला. आणि आपल्यावर एंजलने घोर अन्याय केला आहे असे तिला वाटू लागले. तिने त्याला तसे पत्रही लिहिले. 'एंजल तुम्ही निष्ठुर आहा. क्रूर आहा. मी जाणून बुजून पाप केले नव्हते, हे तुम्हाला माहीत होते. तरी तुम्ही मला टाकले, हे अगदी अक्षम्य आहे. मी तुम्हाला आता विसरून जाईन. तुम्ही केलेला अन्याय अगदी असह्य आहे.'
 मन असे फिरल्यामुळे आणि आई व भावंडे यांना अलेककडे आसरा मिळेल हे दिसल्यामुळे आणि एंजल परत येण्याची आशा समूळ नष्ट झाल्यामुळे, टेसने शेवटी अलेकची मागणी मान्य केली, ती त्याची झाली.
 आणि चारपाच दिवसातच एंजल परत आला. त्याला पूर्ण पाश्चात्ताप झाला होता. तिकडे शेतीत त्याला मुळीच यश आले नव्हते. आणि आपण टेसवर भयंकर अन्याय केला आहे, अशी रुखरुख लागल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी, पुन्हा संसार मांडून तिला सुख देण्यासाठी तो परत आला होता. त्यावेळी अलेकसह टेस एका शहरातल्या हॉटेलात रहायला गेली होती. तिचा पत्ता काढीत काढीत एक दिवस एंजल तिच्यापुढे येऊन उभा राहिला ! तिने पुन्हा लग्न केले आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे, 'मला क्षमा कर, आपण पुन्हा संसार मांडू. माझ्यावर राग धरू नको' असे तिला विनवू लागला. पण वस्तुस्थिती टेसच्या कडून समजताच अत्यंत निराश होऊन तो निघून गेला.
 पण तो गेल्यावर टेसच्या मनातील पतिभक्ती पहिल्याप्रमाणे पुन्हा उचंबळून आली व तिला अलेकचा पराकाष्ठेचा संताप आला. ती लग्नाला तयार नव्हती; पण 'एंजल परत येणे शक्य नाही, तू त्याचा नाद सोडून दे,' असे अलेकने परोपरीने सांगून तिचे मन वळविले होते. तेव्हा आपल्याला खोटे सांगून या चांडाळाने पुन्हा आपला सर्वनाश केला असे मनात येऊन ती भडकून गेली. पिसाट झाली. अलेक अजून निजला होता. त्या खोलीत ती त्वरेने गेली. चीड, संताप, उद्वेग, यांनी तिचे भान हरपले होते. त्या भरात तिने तेथला सुरा उचलला व घावावर घाव घालून अलेकचा खून केला आणि एंजल गेला त्या दिशेने ती धावत गेली.
 एंजलला तिने सर्व हकीकत सांगितली तेव्हा तो स्तंभितच झाला. पण त्या क्षणी त्याने सर्व मनाआड केले व प्रेमभराने तिला त्याने जवळ घेतले. मग तसेच ते दोघे भटकत गेले. कधी एखाद्या खानावळीत, कधी एखाद्या जुन्या पडक्या घरात, कधी चर्चच्या आवारात त्यांनी चार पाच दिवस काढले. आपल्याला पकडण्यास पोलीस येतील हे टेसला माहितच होते. पण एंजलचे प्रेम परत मिळाले, यांतच

स्त्री जीवनभाष्य
८५