पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी तिची पतीवरील भक्ती कमी झालो नाही. तिच्या मैत्रिणी याविषयी बोलताना क्लेअरला दोष देत. पण टेस त्याचा पक्ष घेऊन त्यांना मोडून काढीत असे. तिने स्वतःचे केस असे विचित्र कापून घेतले की, ती विरूप दिसू लागली. पण ते तिने हेतुतःच केले होते. ती म्हणे, 'एंजल इथे नाहीत, मग रूप करावयाचे काय ? त्यांचे माझ्यावर प्रेम नाही पण माझे त्यांच्यावरचे प्रेम रतिमात्र कमी झालेले नाही.' तिच्या हातातली अंगठी पाहून तिच्या पतीची लोक चवकशी करीत. मग बोलण्याला अप्रिय वळण लागे. टेसला ते सहन होत नसे. म्हणून तिने अंगठी हातातून काढून गळ्यातल्या साखळीत अडकवून ठेविली.
 नियतीचा खळ ती असे दिवस कंठीत असताना अलेक डरबरव्हिल हा तिला भेटला. त्यानेच तिच्यावर अत्याचार केला होता. आणि तोच तिच्या सर्व नाशाला कारण झाला होता. पण आता तो धर्मगुरु झाला होता. व गावोगाव पुराण सांगत, प्रवचने करीत हिंडत होता. अशा भ्रमंतीतच त्याची टेसशी गाठ पडली. तिचे कष्ट पाहून तिच्याविषयी त्याला सहानुभूती वाटू लागली. आता त्याच्या मनात थोडे परिवर्तन झाले होते. त्यामुळे आपल्यामुळे टेसचा संसार मोडला कळताच, त्याला फार दुःख झाले. तसे त्याने टेसजवळ बोलूनही दाखविले, तिची क्षमा मागितली व भरपाई म्हणून तुला वाटेल ते साह्य करण्यास मी तयार आहे असे तिला सांगितले, पण टेस त्याच्या वाऱ्यालाही उभी राहिली नाही. तो एंजलवर थोडी टीका करू लागताच तिने त्याला हाकलून दिले, व पुन्हा माझ्याकडे येऊ नको, असे बजावले. पण त्याने ते मानले नाही. तो वरचेवर तिच्याकडे येऊ लागला व तिच्याबद्दल अत्यंत प्रेम व सहानुभूती दाखवू लागला. आणि दोनचार भेटीनंतर त्याने तिला लग्नाची मागणीही घातली. टेस तेव्हा फारच संतापली. तो निघून गेला. पण आता टेसची परिस्थिती हळूहळू बिकट होऊ लागली. तिची नोकरी गेली. म्हणून ती माहेरी परत गेली. तेथे तिचे वडील आजारी होते आणि थोड्याच दिवसात ते वारले. त्याबरोबर माहेरचा तिचा आधारही संपला. अशा स्थितीत तिला भीती वाटू लागली की, एखादेवेळी आपण अलेकची मागणी मान्य करू. म्हणून तिने एंजलला अत्यंत आर्जवाचे एक पत्र लिहिले. तुमचा राग अजून गेला नाही का ? मी फार मोठ्या संकटात आहे. तुम्ही परत या व मला घेऊन जा. तुमची पत्नी म्हणून तुम्हाला मी नको असले तर तुमची दासी म्हणून मी रहायला तयार आहे. पण तुम्ही या. नाहीतर काय होईल हे माझे मलाच सांगता येत नाही.'... आणि दैवदुर्विलासाने तसेच झाले. वडील वारले तेव्हा घर गहाण होते. सावकाराने तगादा लावून डरबरव्हिल कुटुंबाला बाहेर काढले. अन्यत्र जागा पहावयाची तर आता गावातले लोक टेसच्या भ्रष्टतेवर उघड टीका करू लागले. तेव्हा आपण घरी आल्यामुळे आईला व भावंडांना उघड्यावर पडावे लागणार, हे भवितव्य टेसला दिसू लागले. अशा स्थितीत अलेकच्या खेपा चालूच होत्या. त्याचे प्रिया

८४
साहित्यातील जीवनभाष्य