पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'एंजल, एंजल, आता मीही सांगून टाकते. आता तुम्ही मला क्षमा कराल, यात मला शंका वाटत नाही. मलाही कबुली जबाब द्यायचा आहे असं मी पूर्वी तुम्हाला म्हटलंच होते. आठवतं ना ?"
 'हो हो. नक्कीच आठवते. टाक सांगून एकदा.'
 टेसने सर्व पुर्ववृत्त मोकळ्या मनाने सांगितले, अलेक डरबरव्हिलने केलेला अत्याचार, त्यापासून झालेले मूल, त्याचा मृत्यू... सर्व सर्व ! एंजलने कबुलीजबाब दिला होता. त्यामुळे तिला धीर आला होता. आपल्यासारखाच तोही कलंकित आहे, तेव्हा आपल्याप्रमाणेच तोही उदार मनाने आपल्याला क्षमा करील व प्रेमाने जवळ घेऊन त्याची साक्ष पटवील अशी तिची खात्री होती. पण पुरुष होता व ती स्त्री होती !
 तिचे पूर्ववृत्त ऐकता ऐकता तो अगदी थंड होऊ लागले. त्याचे गाढ प्रेम ढासळू लागले. मन शुष्क होऊ लागले. दृष्टी शून्य होऊ लागली.
 'टेस काय सांगते आहेस तू हे ? तू शुद्धीवर आहेस ना? असं होतं तर तू मला पूर्वीच का नाही ते सांगितलस ?, पण हो, तू सांगत होतीस. मीच तुला नको म्हटलं. खर आहे, खर आहे !'
 टेसला धक्काच बसला. तिचा विश्वासच बसेना ! पण त्याच्या मुद्रेवरून तिला सर्व कळून चुकले. तिचा घसा कोरडा पडला. ओढत्या आवाजाने ती म्हणाली, मला क्षमा नाही का करणार तुम्ही ? हाच प्रकार असून मी नाही क्षमा केली ! तशीच मला...!
 'टेस, हे क्षमेच्या पलीकडचं आहे. मी जिच्याशी लग्न केल ती तू नव्हेस. असल्या अपराधाला क्षमा ! हे कसं शक्य आहे?'
 'का बरं असं ?' टेस कळवळून म्हणाली, 'तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मग तुमच्याच्याने असं बोलवतं तरी कसं ! तुम्ही कसेही असलात तरी तुमच्यावरचं माझं प्रेम अभंग आहे. तुमचं प्रेम असं नाही का ?'
 'पुन्हा तुला सांगतो. मी जिच्यावर प्रेम केलं ती तू नव्हेस !'
 अशा रीतीने पहिल्याच रात्री एंजल आणि टेस याचा संसार संपला आणि तिचा त्याग करून एंजल ब्राझीलला निघून गेला. कादंबरीच्या या विभागाचे नाव 'प्रायश्चित्त तेवढे स्त्रीला' असे हार्डीने दिले आहे.
 विषम नीतीचे, स्त्री जीवनातल्या त्या कटू अन्यायाचे, त्या घोर सामाजिक अन्यायाचे दर्शन हार्डीने कसे घडविले, ते येथे स्पष्टपणे दिसले. त्या दृष्टीने कथाभाग तेथे संपला आहे. पण या कादंबरीच्या उत्तरार्धावरून साहित्यातील जीवन भाष्यासंबंधीचा एक महत्त्वाचा विचार मनात येतो. तो विशद करण्यासाठी उत्तरार्धाचाही येथे विचार करावयाचा आहे.
 क्लेअर निघून गेल्यावर टेसने दुसऱ्या एका मळ्यावर नोकरी धरली. ही नोकरी फार कष्टाची होती, मालक फार कजाग होता. त्यामुळे तिचे फार हाल होऊ लागले.

स्त्री जीवनभाष्य
८३