पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि त्याची प्रतिक्रिया काय होते, ते ती निरखू लागली. पण तीन चार दिवस झाले तरी तो काहीच म्हणेना. उलट लग्नाची तयारी त्याने जारीने चालविली. तो खरेदीही सर्व करू लागला. तेव्हा आपले पत्र त्याला मिळाले नसावे, अशी टेसला शंका आली म्हणून तो नसताना ती त्याच्या खोलीत गेली तेव्हा पत्र सतरंजीच्या खाली तसेच पडलेले. तिला आढळले.
 दोघेही कलंकित टेसच्या मनात आले की, देवाच्या मनातच आपले लग्न घडावे, असे दिसते आहे. तेव्हा आपण आता जिकीर करू नये. असे ठरवून तिने ते पत्र फाडून टाकले. तरीही राहवले नाही. म्हणून पुढच्या तीन चार दिवसात एंजलला एकीकडे गाठून, 'मला तुमच्यापाशी एक कबुली जबाब द्यावयाचा आहे' असे ती म्हणालीच. पण एंजलने ते मानले नाही. तो म्हणाला, 'आता आपण ते सर्व लग्न झाल्यावर पाहू. मलाही कबुली जबाब द्यावयाचा आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. लग्नानंतर आपल्याला पुष्कळ वेळ आहे.' एंजललाही कबुलीजबाब द्यावयाचा आहे हे ऐकून टेसचे मन जरा निश्चित झाले. आपण आधी सांगितले नाही यामुळे फारसे बिघडणार नाही, असे वाटून ती निष्पाप रमणी स्वस्थचिन्त झाली.
 प्रायश्चित्त फक्त स्त्रीला लग्न झाले आणि एका लांबच्या मळ्यावरील मित्रांच्या रिकाम्या बंगल्यात ती दोघे मधुचंद्रासाठी गेली. एकमेकांवरील प्रेमाने दोघेही वेडी झालेली होती. स्वर्ग त्यांना ठेंगणा झाला होता. त्यांच्या सुखाला कसलीच सीमा राहिली नव्हती. टेसची रूपसंपदा, गुणसंपदा यांमुळे एंजल अगदी वेडा होऊन गेला होता. 'देवा, या मुलीचे मन यत्किंचितही दुखविण्याचे पाप माझ्या हातून होऊ देऊ नको.' अशी तो मनातल्या मनात प्रार्थना करीत होता. वडिलांनी भेट म्हणून पाठविलेले रत्नजडित दागिनें तो तिला स्वतः घालू लागला. त्या अलंकारांनी तर ती एखाद्या अप्सरेसारखी दिसू लागली. मग त्यांचा सुखसंवाद सुरू झाला आणि त्यातच एंजलला कबुली जबाबाची आठवण झाली. आणि तो टेसला काही सांगू लागला. तो म्हणाला, 'मी हे तुला लग्नापूर्वीच सांगायला हवे होते. पण मग तू मला दुरावशील अशी भीती वाटली. म्हणून नंतर सांगावे, असे मी ठरविले. त्यासाठी तू मला क्षमा करशील की नाही. पण करशील असं वाटतं.'
 'एवढं काय त्यात. शंका कसली त्यात' टेसने आश्वासन दिलं. 'शंका नाही, खात्रीच आहे. पण...ते जाऊ दे एकदा सांगून टाकतो.' असे म्हणून, पूर्वी एकदा मन अत्यंत विषण्ण, उद्विग्न झाले असताना एका स्त्रीच्या सहवासात आपण दोन दिवस स्वैराचारात घालविल्याचे त्याने तिला सांगितले आणि पुन्हा एकदा क्षमायाचना केली. टेसने प्रेमभराने त्याचा हात हातात घेऊन शद्वाविनाच त्याला उत्तर दिले.
 'तर मग आता हा विषय आपण मनातून काढून टाकू. आजच्या आनंदाच्या प्रसंगी तसले काही नकोच.'

८२
साहित्यातील जीवनभाष्य