पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डरबरव्हिल नावाच्या एका श्रीमंत बाईच्या घरी तिने टेसला आग्रहाने पाठविली. टेसच्या हे मनात नव्हते. ती जाण्यास नाखूष होती. पण आईचा अतीच आग्रह झाला. म्हणून ती तिकडे गेली. आणि त्यामुळे त्या बाईचा मुलगा अलेक् यांच्या जाळ्यात सापडली. अलेक हा चंगीभंगी, मवाली असा, जुन्या श्रीमंत सरदार घराण्यातल्या वारसा सारखाच, बहकलेला तरुण होता. त्याने टेसला फसविले, रानात नेले ब तिच्यावर बलात्कार केला. आणि टेस कुमारी माता झाली. तिचे मूल लवकरच गेले. आणि अशा स्थितीत त्याच खेड्यात राहणे टेसला बरे वाटेना. म्हणून टॉलबोथे या दूरच्या एका गावी एक गोशाळा होती. तेथे नोकरीसाठी ती गेली. तेथेच एंजल क्लेअर या उदारमतवादी तरुणाची व तिची गाठ पडली.
 माझी योग्यता नाही एंजल हा एका धर्मगुरुचा मुलगा. त्याचे थोरले भाऊ केंब्रिजला शिक्षण घेऊन नंतर धर्मगुरूच झाले होते. पण एंजलला धर्मगुरू व्हावयाचे नव्हते. त्याला शेतकरी व्हावयाचे होते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हवा म्हणून तो या गोशाळेत येऊन राहिला होता. टेस ही अतिशय देखणी होती. तिची शरीरयष्टी सुदृढ होती. आणि विनय, लज्जा, कामसूपणा हे स्त्रीचे सहज गुणही तिच्या ठायी असल्यामुळे प्रथमपासूनच एंजलचे मन तिच्यावर जडले. हळूहळू दोघांची मने जमत चालली. एंजल आपले प्रेम व्यक्त करू लागला. टेसच्या मनातही प्रेमोद्भव झाला. पण आपण कलंकिता आहोत, या जाणिवेने ती त्याच्यापासून दूर-दूरच राहू लागली. एंजलने तिला मागणी घातली तेव्हा तिने नकार दिला आणि तो कारण विचारू लागला तेव्हा ते सांगता येणार नाही असे ती म्हणाली. पण एंजल तेवढयावर तिला सोडण्यास तयार नव्हता. 'मी तुमच्या योग्यतेची नाही, तुम्ही शहरी, शिकलेले सुसंस्कृत आणि मी एक खेडवळ मुलगी' अशी कारणे ती सांगू लागली ती त्याला अगदीच पटेनात. तो म्हणाला, 'मला अशीच बायको हवी आहे. मी मोठा मळा. घेणार आहे. मला शेतकरी व्हावयाचे आहे. तुझ्यासारखी बायको मला मिळाली तर मी भाग्यच समजेन 'तरीही टेस होकार देईना. ती आता अतिशय प्रेमविव्हल झाली होती. पण तिला भीती वाटत होती. मागून आपले पूर्वचरित्र समजून सर्वनाश होण्यापेक्षा आजच नकार द्यावा हे बरे, असे तिला वाटत होते. पण हळूहळू तिचे मन तिच्या कह्यात राहीनासे झाले. क्लेअरसारखा तरूण आपल्याला पति म्हणून लाभतो आहे; आपण पुर्ववृत्त सांगितले तर आपला नाद सोडील व मग आपले जीवित निःसार होईल, याच्या यातनाही तिला असह्य होऊ लागल्या. आणि क्लेअरचा आग्रह तर वाढतच चालला होता. तेव्हा एक दिवस तिने सोक्षमोक्ष करण्याचे ठरविले. त्याला सर्व हकीकत सांगून टाकण्याचा तिने निर्धार केला. पण प्रत्यक्ष भेटीत तिचा निर्धार टिकला नाही आणि प्रेमाच्या लाटेत सापडून ती त्याला होकार देऊन बसली. पण घरी आल्यावर तिचे मन तिला खाऊ लागले. म्हणून मग तिने एका पत्रात आपले सर्व पूर्ववृत्त लिहून ते पत्र त्याच्या खोलीत टाकून दिले.

स्त्री जीवनभाष्य
८१