पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचविण्याचा हक्क नाही. आपल्या पित्याचे मन अंतकाळी दुखवू नये, हा हक्क नाही. माझा याच्यावर विश्वास बसत नाही. पण त्या जगाचे ज्ञान मला करून घेतले पाहिजे. मी मुलांना वाढविण्यास खरेच लायक नाही ! कारण मीच एक लहान मूल आहे. तुम्हीच मला वाढू दिले नाही. पण आता मला स्वतःचे शिक्षण करावयाचे आहे. येथे राहून ते होणार नाही. मी एक कोकिळा साळुंकीच राहीन. म्हणून मी येथे राहू शकत नाही. माझे तुमच्यावर प्रेम नाही. तुमचेही माझ्यावर नाही. मग परक्या पुरुषाबरोबर रात्री मी कशी राहणार ?'
 टोरवॉल्ड हे ऐकून अगदी गांगरून गेला. नोराच्या म्हणण्यात काही तथ्यांश आहे असे क्षणभर त्याला वाटले. तो तिच्या विनवण्या करू लागला. शेवटी त्याने विचारले, 'नोरा तू पुन्हा कधीच परत येणार नाहीस काय ?' ती म्हणाली, 'तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन झाले, आणि आपले सहजीवन म्हणजे खराखुरा विवाह झाला तर मी अवश्य परत येईन.' इब्सेनचे हे नाटक म्हणजे 'न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति' या सिद्धान्ताला दिलेले मूर्त रूप होय.
 २ विषम नीती इंग्लिश कादंबरीकार थॉमस हार्डी याने अशाच एका स्त्रीच्या जीवनाची कहाणी सांगितली आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या बाबतीत समाज नीतिनिकष कसे भिन्न मानतो, ते त्याला दाखवायचे आहे. स्त्रीजीवनाच्या दुसऱ्या एका अंगाचे हे दर्शन आहे. पुरूष स्त्रीला एक खेळणे कसे मानतो हे इब्सेनने दाखविले आहे. आणि अत्यंत उदारमतवादी पुरुषसुद्धा वैवाहिक नीतीचा प्रश्न येताच अत्यंत विषम नीतीचा पुरस्कर्ता कसा होतो ते हार्डीला दाखवावयाचे आहे. 'टेस डरबरव्हिलिस' या कादंबरीत त्याने ते एंजल क्लेअर ही रेखा काढून दाखविले आहे. नोरा आणि टेस या आयुष्याच्या प्रारंभी जुन्या जगातल्या अश्राप, निरागस भोळ्या मुली होत्या. नोरा उत्तर काळात अगदी बदलली. तिच्यात फार मोठे परिवर्तन होऊन ती नव्या युगात आली. टेसमध्ये हे परिवर्तन झाले नाही. स्त्रीपुरुष विषमतीबद्दल ती तक्रार करीत नाही. एंजलवरचे तिचे प्रेम, तिची निष्ठा, तिची भक्ती अगदी आर्य पतिव्रते प्रमाणेच आहे. म्हणूनच कादंबरीला 'टेस' असे नाव देऊन हार्डीने 'एक निष्पाप स्त्री' असे दुसरे उप-नाव दिले आहे.
 कुमारी माता  बेसेक्स परगण्यातील मॅरलॉट या खेड्यात राहणारी टेस ही एका खेडुताची साधी भोळी, तरुण कन्या. जॉन डर्बीफील्ड हा तिचा बाप जरा भ्रमिष्टच आहे. घरी दारिद्र्य आहे, अन्नान्नदशा आहे, कसलीही प्रतिष्ठा नाही. पण आपण इतिहासांत गाजलेल्या डर्बीफील्ड या मोठया सरदार घराण्यातलेच आहोत, असे त्याच्या मनाने घेतले आहे. आणि त्या जगातून भोवतालच्या दरिद्री जगात उतरण्यास तो मुळीच तयार नाही. टेसची आई जोन ही तितकी झपाटली नाही, पण तिच्या डोक्यात भ्रमण तेच आहे. त्यामुळेच तेथून काही मैलांवर राहणाऱ्या

८०
साहित्यातील जीवनभाष्य