पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रारंभ झाला होता. आता तिचे तिला ते स्पष्ट होऊ लागले. तिच्या मनात होत असलेली ही उलथापालथ इब्सेनने विलक्षण कौशल्याने व्यक्त केली आहे, टोरवॉल्डचा तो भडिमार चालू असता एरवी ती रडली असती, त्याच्या पाया पडली असती, तिनें त्याची करूणा भाकली असती. पण तसें ती काही करीत नाही. थंडपणे, अलिप्तपणे शांतपणे ती होय, नाही, असे आहे, हे खरे आहे, अशी उत्तरें देते. पण तेवढ्यामुळे तिचा केवढा भ्रमनिरास झाला आहे, पतीचे एक खेळणे या पलीकडे आपल्याला कशी किंमत नव्हती हे ध्यानी येऊन तिला केवढ्या वेदना होत आहेत, त्याच्यासाठी, त्याच्या सुखासाठी, त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्या प्रतिष्ठेसाठी त्याला आपण प्रिय होतो. आपल्यासाठी नव्हे हे तिला कसे आढळले. हे नाटक नुसते वाचतांना सुद्धा, ध्यानी येते. मग रंगभूमीवर ते किती स्पष्ट होत असेल याची सहज कल्पना येईल. खरे नाट्य ते हेच.
 टोरबॉल्ड नोराला ती कटु विखारी वाणी ऐकवत असताना एक माणूस. आत आला व त्याने क्रॅगस्टॅडचे पत्र त्याला दिले. क्रॅगस्टॅडने मूळचे कर्जखतच परत केले होते. व आपल्याला यासंबंधात पुढे काही करावयाचे नाही असे लिहिले होते. लिंडाने हे सर्व घडविले होते. आपले एकाकी भणंग जीवन संपून आपल्याला जरा सुखाचे दिवस येणार म्हणून क्रॅगस्टॅडला आनंद झाला होता. व त्याने लिंडाचे म्हणणे मान्य करून नोराच्या सहीचा दस्त रद्द करून तो परत केला होता. तो पाहून टोरबॉल्डला अगदीं हर्ष झाला. आपली प्रतिष्ठा वाचली, आता आपल्या किर्तीला काळे लागत नाही, हें ध्यानी येऊन त्याने आपले बोलणे एकदम फिरविले, तो म्हणाला "नोरा, देवानेच साकडे निवारले. आता काळजीचे कारण नाही. आता भीती नाही. मी तुला अगदी पूर्णपणे क्षमा करतो. तू केलेस ते माझ्यासाठी, माझ्यावरील प्रेमामुळेच केलेस, हे मी जाणतो. प्रत्येक स्त्रीने असेच केले पाहिजे. तुला व्यवहार कळला नाही हे खरे. पण त्यात काय आहे ? मी बोललो ते विसरून जा. मी तुला क्षमा केली आहे. आपला संसार आता सुखाचा होईल."
 जगाचे ज्ञान हवे पण नोराने आता ते घर सोडण्याचा निश्चय केला होता. तिने तसे टोरवॉल्डला स्पष्टपणे सांगितले तेव्हा त्याला धक्काच बसला. हे काय आहे, निघून जाण्याचे कारण काय, हे त्याला कळेचना. नोरा म्हणाली, एका क्षणापूर्वी मुलांना वाढविण्यास मी नालायक होते. आता लायक कशी झाले ? तुमच्यावरचे संकट टळले तेव्हा तुम्ही बोलणे फिरविले. माझ्यावर संकट होते तेव्हा तुम्ही आपल्यावर जबाबदारी घ्याल, असे मला वाटले होते. पण तुम्हांला मी तुमच्या सुखासाठी हवी होते. माझे काय होईल, याची तुम्हाला परवा नव्हती. आपले हे घर नव्हते, संसार नव्हता मी तुमची पत्नी नव्हते. एक बाहुली होते. आठ वर्षे तुम्हीं माझ्याशी खेळलात. मी मोठी झाले नाही. आता मला प्रौढ व्हावयाचे आहे. जग समजावून घ्यावयाचे आहे. या जगात कायदा असा आहे की स्त्रीला आपल्या पतीचे प्राण

स्त्री जीवनभाष्य
७९