पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नोराने एक गफलत करून ठेविली होती. तिचे वडील २९ सप्टेंबरला वारले होते. आणि तिने त्यांची सही ३ ऑक्टोबरला केली होती. नोरा ही भोळी, निरागस, निष्पाप स्त्री होती. आपण हे कृत्य पतीचे प्राण वाचविण्यासाठी करीत आहो तेव्हा यात पाप मुळीच नाही, असे तिला वाटत होते. एवढेच नव्हे तर हे कृत्य कायद्याच्या विरुद्ध आहे हेच तिला पटत नव्हते. आपल्या पतीला व पित्याला वाचविण्याचा अधिकार स्त्रीला नाही की काय ? कायदा तसा असणे शक्यच नाही, असे तिचे मत होते. आणि क्रॉगस्टॅडने सही मधली गफलत तिच्या ध्यानी आणून दिली तेव्हा तिने निर्भयपणें 'मी स्वतःच वडिलांची सही केली आहे,' असे त्याला सांगितले. 'ही तुमची कबुली तुम्हाला फार घातक आहे,' असे तो सांगू लागला. पण नोराला. ते पटेचना. कायदा असा असणे शक्य नाही. हेच तिचे म्हणणे.
 नोराची ही व्यक्तिरेखा निर्मून इब्सेनने जुन्या काळच्या निष्पाप निरागस स्त्रीचे अत्यंत लोभस चित्र जगाला दाखविले आहे. आणि त्याचबरोबर कायदा, व्यवहार यांचे जग आणि सद्भावना, निर्व्याजवृत्ती, यांचे जग ही दोन जगे किती भिन्न आहेत हेही दाखविले आहे. नोरा दुसऱ्या जगात रहात होती. त्यामुळे क्रॉगस्टॅडचा नाइलाज झाला. हे सर्व प्रकरण मी हेल्मर यांना सांगणार आणि ते कर्जखतही त्यांना दाखविणार मग माझी नोकरी कशी जातें ते पाहतो, अशी धमकी देऊन तो निघून गेला.
 पती रक्षण कर्ता ? तो गेल्यावर मात्र नोरा अस्वस्थ झाली. जग आपण समजतो तसे नाही, असे तिला वाटू लागले. यातून काही तरी अनर्थ होणार, अशी भीती तिला वाटू लागली. क्रॉगस्टँडला काढू नका, असे ती पतीला विनवू लागली.- आणि तो मोठा वाईट मनुष्य आहे, वर्तमानपत्रातून तुमची उगीचच निंदा नालस्ती, करील, असे कारण. सांगू लागली. याला भिऊन आपला निर्णय बदलावा, असे नोराने आपल्याला सांगावे. यात टोरवॉल्डला अपमान वाटला. या भानडीत तू पडू नको, हा तुमचा बायकांचा विषय नाही असे सांगून त्याने तिला गप्प केले, त्यानंतर आपली मैत्रीण लिंडा हिला नोराने सर्व हकीकत सांगितली तोंपर्यंत कॉगस्टँड याने टपालाच्या पेटीत सर्वप्रकरणाचे पत्र आणून टाकले होतें. हेल्मर घरी येतात ते पत्र त्याच्या हाती पडणार आणि मग आग लागणार हे नोराच्या ध्यानी आले त्यापूर्वीच घरांतून निघून जावे, जीव द्यावा असे तिला वाटू लागले, 'तू खोटे बोललीस, माझी फसवणूक केलीस, खोटी सही करून माझ्या नावाला काळिमा लावलास' असे आरोप पती आपल्यावर करणार, हे तिच्या ध्यानी आले. तरी तिला मनातून एक आशा वाटत होती. आपल्या पत्नीने, आपल्या लाडक्या नोराने, आपल्या कोकिळेने, आपल्या साळुंकीने हे सर्व आपल्यासाठी केले, आपण रोगमुक्त व्हावे, आपले प्राण वाचावे यासाठी केले, तिचा दुसरा तिसरा कसलाहिं हेतू यात नव्हता. हे जाणन टोखॉल्ड ही सर्व जबाबदारी धैर्याने स्वतःवर घेईल, आपले रक्षण करील, आपल्याला पाठिशी घालील, असे तिला वाटत होते. पण लिंडाला ते पटले नाही. तिने आपल्या मैत्रिणीला या

स्त्री जीवनभाष्य
७७