पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घराबाहेरच्या जगाचे वास्तव रूप न जाणणारी अशी एक जुन्या काळची पतिव्रता स्त्री आहे. आणि तिच्या संसारावर विचित्र संकट आले नसते तर याच निरागस मनोवृत्तीने शेवटपर्यंत संसार करून तिने आपला आयु:क्रम संपविला असता. पण एका एकी टोरवॉल्ड हेल्मर आजारी झाला. त्यांला अगदी घातक असा रोग बडला. आणि इटलीसारख्या दक्षिणेकडच्या प्रदेशात वर्षभर राहून हवापालट केल्यावाचून टोरवॉल्ड बरा होणार नाही, असे डॉक्टरानी सांगितले. टोरवॉल्डची प्राप्ती बेताची होती. हा खर्च त्याला झेपण्याजोगा नव्हता. शिवाय काही घातक रोग झाला आहे, हे त्याला कळू द्यावयाचे नव्हते. म्हणून ही सर्व जबाबदारी नोरावर पडली. तिने वडिलांच्याकडून पैसे आणले असते. पण तेही शेवटच्या दुखण्याने अंथरुणावर पडून होते. नवऱ्याला काही असाध्य व्याधी जडली आहे, हे त्यांना त्या स्थितीत सांगणे, नोराला योग्य वाटले नाही. म्हणून तिने कॉगस्टॅंड नावाच्या गावातल्याच एका गृहस्थाकडून अडीचशे पौंड कर्ज काढले, त्यावेळी केवळ स्त्रीच्या सहीवर कर्ज मिळत नसे. कोणी तरी पुरुषाची सही लागत असे. त्यामुळे नोरा मोठचा पेचात सापडली. पती व पिता यावाचून तिला कोणीच सही दिली नसती. त्यांना तर यातले काही सांगावयाचे नव्हते. म्हणून मग तिने स्वतःच वडिलाची सही कर्जखतांवर केली, पैसे घेतले व पतीला घेऊन ती वर्षभर इटलीत राहिली. तेथे टोरवॉल्ड खडखडीत बरा झाला व परत येऊन आपल्या कामाला लागला.
 अर्थार्जन निषिद्ध आता ते कर्ज नोराला फेडावयाचे होते. त्यावेळी स्त्रीने अर्थार्जन करणे हे अगदीच निषिद्ध होते. म्हणून पतीच्या नकळत नोरा काही काम मिळवू लागली. मधूनच त्याच्याकडून काही निराळ्याच कारणासाठी पैसे मागून घेऊ लागली. आणि अशारीतीने ती कर्ज फेड करू लागली. या लपवा- छपवीमुळे नोराला फार कष्ट, फार यातना सोसाव्या लागल्या. पण पतीसाठी व मुलांसाठी तिने त्या सर्व सोसल्या. अशी आठ वर्षे गेली. कर्ज बरेचसे फिटले. त्याच सुमाराला टोरवॉल्डला एका बँकेत मॅनेजरची जागा मिळाली. त्यामुळे हेल्मर घरांत मोठा आनंद झाला. नोराला मोठी सार्थकता वाटली. तीन मुलं होती. कर्ज फिटत आले होते. आणि पतीला मोठी नोकरी मिळाली होती. पण त्या नोकरीतुनच सर्व नाश ओढवावयाचा होता. मानवी जीवन असे विचित्र आहे. जी घटना आनंदाची, धन्यतेची असे त्याला वाटते तीच पुष्कळ वेळा घातक ठरते. नोराच्या बाबतीत तरी तसे झाले.
 क्रॉगस्टँड त्याच बँकेत नोकरीला होता. पण त्याचे वर्तन निर्मळ नव्हते. त्याने अनेक उचापती केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या नोकऱ्या गेल्या होत्या. वॉल्ड हेल्मर याला हे सर्व माहित होते. म्हणून सूत्रे हाती घेताच त्याला काढून टाकावयाचे, असे त्याने ठरविले. याच सुमारास लिंडा नावाची नोराची जुनी मैत्रिण तिच्याकडे आली होती. ती विधवा होती. आणि कसलाच आधार नसल्यामुळे तिला नोकरी हवी होती. नोराने पतीला तसे सांगताच त्याने तें एकदम मान्य केले. कारण कॉंगस्टॅडची जागा रिकामी होतच होती. नियतीचा खेळ असा की, आपल्या मैत्रिणीची शिफारसं स्वतः नोरानेच केलेली असताना तिलाच आता कॉगस्टॅडला काढू नका. लिंडाला नोकरी न दिली तरी चालेल असे पतीला विनविण्याची पाळी आली. आणि तेही, खरे कारण न सांगता !

दलित जीवन
७५