पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिवंत अशी वाङ्मये वाटेल तितकी निर्माण होतील. आपला समाज अज्ञ आहे, बिभिस्त आहे, क्वचित ओंगळ आहे; पण एवढ्याने त्याला आपण दूर लोटता कामा नये. त्याचे मनोगत ममत्वाने ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. हा सर्व समाज या विवंचनेत आहे की आपल्या दुःखाला आणि काळज्यांना कोणी वाचा फोडील काय ? मी स्वतः ललित वाङ्मयात जो अल्पसा प्रवेश केला आहे तो याच बुद्धीने !'
 हे शेवटचे वाक्य माटे यांच्याच बाबतीत खरे आहे असे नाही. व्यास, वाल्मीकी हरिभाऊ, स्टोवे, व्हिक्टर ह्यूगो टॉलस्टॉय, या सारख्या सर्व थोर साहित्यिकांचे तेच लक्षण आहे. ते वाङ्मयात याच हेतूने प्रवेश करतात. त्याचे साहित्य अमर झाले आहे ते याच कारणाने.
 स्त्रीची प्रतिष्ठा स्त्री जीवन हा बहुतेक सर्व ललित लेखकांचा अत्यंत प्रिय असा विषय आहे. मानवी संसारात स्त्रीने अर्ध्याहून अधिक क्षेत्र व्यापलेले असल्यामुळे कोणतीही कादंबरी असो, नाटक असो, लेखक त्या कृतीत आपला स्त्रीजीवन विषयक दृष्टिकोन व्यक्त करीतच असतो. त्यातूनही गेल्या शतकात जगातल्या प्रत्येक देशात सामाजिक क्रांतीच्या घोषणा होत असल्यामुळे व ती तत्त्वे प्रसृत होत असल्यामुळे स्त्रीच्या प्रतिष्ठेविषयीचा सर्व समाजाचाच दृष्टिकोन बदलत आहे. साहित्यात त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्यच होते. ते पडसाद काय आहेत ते पाहता असे दिसते की, स्त्रीपुरुषात असलेली विषमता आणि आजपर्यंतच्या समाजाचे स्त्रीला दिलेले हीन स्थान हा घोर असा अन्याय आहे, असेच मत बहुतेक सर्व ललित लेखकांनी मांडलेले आहे. इब्सेनचे 'डॉलस हाऊस' हे नाटक, हरिभाऊच्या 'पण लक्षात कोण घेतो,' 'मी' या कादंबऱ्या, हार्डीची 'टेस' ही कादंबरी, तांब्याच्या 'निःशब्द आत्मयज्ञ,' 'हिंदुविधवेचे मन' इ. कविता, फडके यांची 'उद्धार' माडखोलकरांची 'भंगलेले देऊळ' या कादंबऱ्या या ललितकृतीत हेच मत निरनिराळ्या पद्धतीनी या लेखकांनी मांडलेले आहे. त्यांच्या ललितकृतींचा परिचय करून घेऊन त्यांनी मानवी जीवनातल्या या गहन गंभीर विषयासंबंधी काय भाष्य केले आहे ते आता पहावयाचे आहे.
 १ बाहुली 'डॉलस हाऊस' हे इब्सेनचे जगविख्यात नाटक आहे. त्या नावातच इब्सेनचा भावार्थ दिसून येतो. स्त्री ही एक बाहुली आहे, पुरुषाचे ते एक खेळणे आहे, मनोविनोदन आहे अशा दृष्टीने पुरुष तिच्याकडे पहातो, त्याच्या मते तिचे तेच स्थान आहे, हे या नावातून इब्सेनने ध्वनित केले आहे. आणि हाच ध्वन्यर्थ सर्व नाटकात विशद केला आहे.
 नोरा ही या नाटकाची नायिका- टोरवॉल्ड हेल्मर याची पत्नी- ही अगदी भोळी भाबडी, घर, संसार, मुलेबाळे यात पूर्ण रमून गेलेली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तेच आपले कार्य, असे मानणारी, पतीच्या अर्ध्यावचनात राहणारी, आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, असावे, असे चुकून सुद्धा जिच्या मनात येत नाही अशी,

७४
साहित्यातील जीवनभाष्य