पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकल्या पाहिजेत, हाच त्या सर्वांचा आशय असतो. या परिस्थितीमुळे मानवी गुणांची आणि एकंदर त्या जमातीची हत्या होत असते. अस्पृश्यतेच्या रूढीमुळे त्या जमातींची कशी हत्या हिंदुसमाजानें केली आहे हे सगाजी बुवाच्या कथेतून माटे यांनी अत्यंत भेदक शब्दांत स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, 'शंभरावर जगलेल्या या माणसाच्या प्रदीर्घ आयुष्यावरून जीवन वाहत होते, परंतु त्याच्या जीवनात कोणताही फरक पडला नाही. कारण ? कारण एकच ! त्याला स्वतःचे भवितव्य घडविण्याचा अधिकार समाजाने नाकारला होता. तो अस्पृश्य होता. वास्तविक त्याला मन होते, बुद्धी होती, भावना होती, आकांक्षा होती. त्याला ईर्षा आणि असूयाही असली पाहिजे. त्याला हास्य होते व प्रपंचाची हौसही असली पाहिजे. पण या सर्वांचे केवळ अणुरेणु त्यांच्या पिंडांत होते. त्याने पुस्तके वाचली असती, लिहिली असती, सभेत उभे राहून गर्जनाही केल्या असत्या. शेताच्या बांधावर उभे राहून सरकारी करवसुलीसाठी आलेल्या कामगारांना ढेकूळ भिरकावून मारले असते. पण सगाजीचे यांतले काहीच झाले नाही. कारण त्याला मानवकोटीच्या पहिल्या रस्त्यावर पाऊल टाकायलासुद्धा संधी नव्हती. तो अस्पृश्य होता. एक उभा मानवप्राणी शंभर वर्षे जगला आणि जगाकडे लांबून पहात पहात शेवटी थिजलेल्या डोळ्यांचे विरलेले जीर्ण पडदे त्याने कायमचे लावून घेतले.'
 हेतु प्रधानता महार, मांग, रामोशी या उपेक्षितांच्या अंतरंगाचे वर्णन करताना माटे यांनी हे अमरसाहित्य निर्माण केले आहे. त्यांच्या कथा हेतुप्रधान आहेत असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात येतो. आणि मराठीतल्या पहिल्या श्रेणीतल्या दोनचार कथाकारांचा उल्लेख करताना त्यांचा उल्लेख सहसा कोणी करीत नाहीत. कारण त्यांच्या कथा हेतुप्रधान आहेत. आमच्या टीकाकारांची वाङ्मयाभिरूची किती हीन पातळीला गेली आहे, याची यावरून कल्पना येईल. जिवंत अनुभवातून माटे यांनी या कथा लिहिल्या आहेत. विशाल सहानुभूती हे थोर साहित्यिकाचे लक्षण म्हणून सांगतात. या कथांत सह-अनुभूतीचे विशालत्य जेवढे दिसते तेवढे अन्यत्र सापडणे दुर्मिळच आहे. त्या अनुभूतीचा प्रत्यय प्रत्येक शब्दागणिक वाचकांना येत असतो. असे असूनही हेतु प्रधानता हा दोष जाणवून त्या कथा जर कोणाला कमी प्रतीच्या वाटत असल्या तर 'अरसिकेषु कवित्व निवेदन' हे विधीने माटे यांच्या शिरसि लिहिले होते, असे म्हणावे लागेल. अंकल टॉम, लेमिझरेबल्स, वॉर अँड पीस, महाभारत, रामायण, हे सर्व अक्षर साहित्य हेतुप्रधानच होते. आणि साहित्य तसेच असावे, असे त्या साहित्यिकांचे मत होते. माटे यांचे मत तसेच होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी तरूण लेखकांना याच प्रकारचे साहित्य तुम्ही लिहावे, असे आवाहन केले आहे. ते म्हणतात, 'आमच्या सर्व विचारवंतांचा मोहरा स्वकीयांकडे वळला पाहिजे, या समाजाच्या सर्व थरातून आपले मन सहानुभूतीने खेळत ठेवणे; हा व्यापार जर आपण चालू ठेविला तर अगदी

दलित जीवन
७३