पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महमदभाई हा एक शिपाई. त्याच्यावर साहेब काही कारणाने रागावले होते. कोणीसे म्हणाले 'आता महमदभाईला लांब नेऊन घालत्याल. त्यावर तानी कांय म्हणते ! 'अन् भाई जायाचं मंजी बेगमबी जायाची का ? आये, मंग आपल्याला पानी कोन वाडील ग?' हिंदू बाया वाढणार नाहीत हे नक्की !
 रात्री गावात कीर्तन होते. मामलेदार, फडणीस ही बडी मंडळी लोडाला टेकून बसली होती. इतक्यात फौजदार आले. ते मुसलमान होते. मंडपात येण्यास ते बिचकू लागले. पण मामलेदार म्हणाले, 'या, या, हरकत नाही. आज हरिवोवांचा उत्सव आहे. हरिवोवा सगळ्यांचेच होते !' अर्थातच फौजदार मामलेदारांच्या शेजारी बसले. थोड्या वेळाने पोरांना घेऊन पिऱ्या आला. पोरे म्हणत होती, 'बाबा, मंडपात चला ना!' लोक त्याला दरडावीत होते, 'पिऱ्या, लेका बाजूला हो त्यांना लागशील ना !'
 हरिबोवा सर्वांना सारखे लेखीत. आज त्यांचा उत्सव होता. बोवांनी, एकनाथांनी गाढवाला पाणी पाजल्याची कथा सांगितली. ती सांगताना ते संतांच्या भूतदयेचे सारखे वर्णन करीत होते. "त्यांना गाढवाचा आत्मा माणसाच्या आत्म्याहून निराळा वाटत नव्हता. सर्व चराचरात परमात्मा भरला आहे. भूतमात्राचे ठायी त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. 'भूतदया गाईपशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वनामाजी ॥' असे तुकाराम महाराज म्हणतात."
 घराकडे जाताना तानी म्हणाली, 'बाबा, त्या गाढवाच्या पोराला बामनानं कांवडीचं पानी पाजलं, अन आपल्याला गावच्या हेळावर कावं भरू देत न्हाइती ?" त्यावर पिऱ्या उद्गारला, 'तुला काय सांगू ? आपला शिद्या मोठा झाला की गावकऱ्याना विचारील जाब याचा!'
 उपेक्षितांचे अंतरंग हे असे आहे. प्रेम, माया, वात्सल्य या भावना वरिष्ठ थरातल्याप्रमाणेच त्यांनाही आहेत. उच्चकुळीचा अभिमान त्यांनाही वाटतो. उच्च ध्येयाच्या आकांक्षा त्यांच्याही अंतःकरणात वावरत असतात. माणुसकी हे सर्वांत श्रेष्ठ मूल्य हा विचार ते आचरूनही दाखवितात. वरिष्ठ वर्णातील संताच्या वचनांची वटवट कशी पोकळ आहे हे त्यांनाही जाणवते. आणि अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, या समाजाला जाब विचारला पाहिजे ही उर्मी त्या अंतरंगातही उसळते.
 जमातीची हत्या अर्थात परिस्थिती भयानक असताना, अत्यंत प्रतिकूल असताना, उत्कर्षाची कसलीही संधी नसताना दलित समाजांत प्रत्यक्षात अशी उदाहरणे तुरळक सापडणार हे उघडच आहे. भीषण परिस्थितीवर मात करून वर येण्याइतकी गुणसंपदा फारच थोड्या लोकांच्या ठायी असणार. थोर साहित्यिक अंकल टॉम, जीन वॉलजीन, सत्या, पिऱ्या अशांची उदाहरणे देऊन कथा रचतात तेव्हा त्यांना हेच सांगावयाचे असते. या दलित समाजाच्या ठायी वरिष्ठ समाजासारखीच गुणसंपदा असते पण परिस्थिती, वर्णद्वेष, कायदा, अस्पृश्यता त्यांच्या त्या गुणांना अवसर मिळू देत नाही, म्हणून परिस्थितीने त्याच्या हातीपायी घातलेल्या शृंखला समाजाने तोडून

७२
साहित्यातील जीवनभाष्य