पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर धादा दर्शन घडल. तवा तुमी पालीच्या जत्रेचा नाद सोडा.' पण पिऱ्याला हे बोलणे मानवले नाही. तो म्हणाला, 'चंद्राबाई तू अशी कशी बोलतीयास. आग, वर्सातन एकदा दरसान घडतया; त्यवडबी सोडल तर चोरी दरूड्या पलीकडं काय रायलं !
 चोरी दरूड्यापलीकडे, पोटाच्या व्यवसायापलीकडे काही असणे यातच भूषण आहे. यातच जीवनाचे सार्थक आहे, अशी पिऱ्याची, एका मांगाची, एका खुनी दरोडेखोराची श्रद्धा आहे. वरिष्ठ समाजात जीवनाचे हेच भूषण मानतात. तेथे याला ध्येयवाद म्हणतात, श्रेष्ठ मूल्ये म्हणतात, त्याग, आत्मार्पण, हौतात्म्य म्हणतात. ती भाषा पिऱ्याला येत नाही. म्हणून त्याच्या अंतरंगातला तो आशय माटे यांनी त्याच्या रांगड्या भाषेत सांगितला आहे. पिऱ्या म्हणतो, 'चंद्राबाई, ह्ये बग ह्यो पिऱ्या गुराचं मुडदं फाडायला अन चराटं वळायला जन्माला न्हाइ आला. असं. म्येलेलं आन खानारा न्हव ह्यो पिऱ्या. तू का घाबरतियास ? खंडुबा आपल्या पाठीवर हाये. जत्रला जायाचं मात्र सोडू नग.'
 या गोष्टीच्या प्रारंभीच माटे यांनी हिंदुसमाजाचे वर्णन केले आहे. या समाजाला सरोवराची उपमा देऊन ते म्हणतात, 'हे समाजसरोवर काळसर, गढूळ आहे. त्या पाण्याला कसलाही प्रसाद राहिलेला नाही.पण पाहणाराची दृष्टी प्रासादिक असली तर नाना प्रकारचे जलचर वावरताना त्याला येथे दिसतात. जाता जाता दृष्टी तळाशी गेली म्हणजे भली दांडगी पण जड कासवे तळाशी बसलेली दिसतात. एखाद्या वेळी एखादे कासव खडबडून उठते आणि पाण्यात उफराटा तीर मारून पृष्ठाकडे बिनदिक्कत झेपावते. त्याला पाहून सगळे पाणी व सगळे जीव गलबलतात. पिऱ्यामांग ह्या धाडशी प्राण्यापैकीच एक होता' याच पिऱ्याच्या वर्णनाला उद्देशून प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, तारळ खोऱ्यातील पिऱ्याचे सामाजिक उत्थान कोणत्या रूपाचे आहे ते येथे सांगितले आहे.
 जाब विचारणार ! 'एका अस्पृश्याच्या डायरीतील पाने' या कथेतील पिऱ्याच्या निवेदनातून अस्पृश्यांच्या अंतरंगाचे दर्शन तर होतेच, पण त्याचबरोबर हिंदु समाजाच्या अंतरंगाचे दर्शनही होते. अत्यंत थोर संस्कृतीचा हजारो वर्षांचा वारसा सांगणारा हा समाज अस्पृश्यांना कसा दिसतो, ते या डायरीवरून कळून येते. साहेबांचा मुक्काम गावात होता. पहाटे पासून दिवस डोईवर येईपर्यंत पिऱ्या सारखा राबत होता. मग घरी आला तो कळले की, दोन्ही पोरे शिद्या अन् तानी पाण्याला गेल्याती. तो तसाच पाणवठ्याकडे गेला. तानी पाण्यासाठी विनवण्या करीत होती. तिला कोणी पाणी वाढत नव्हते. तेवढ्यात महंमदभाईची बहीण पाण्याला आली. तिने तिला पाणी वाढले. रक्मीचा घडा भरून पाणी इकडे तिकडे वाहवले. ब्राह्मणिणी, कुणबिणी किंचाळून म्हणाल्या, 'अग ए ! तुझं विटाळाचं पाणी इकडं येतंय ना!' पिऱ्या थट्टेने म्हणाला, 'आमचा इंटाळ झाला ! अन त्या बेगमसाहेबानं हेळात शिरून चुळा थुंकल्या त्याचं काय ?'

दलित जीवन
७१