पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संस्कृती म्हणजे याहून निराळे काय असते ? हिरेमाणके सोने या पेक्षां माणुसकी श्रेष्ठ मानणे यालाच संस्कृती म्हणतात. एवढे धन टाकून देण्यांत सत्याने जो मनोनिग्रह दाखविला त्यालाच संस्कृती म्हणतात. दूधभात एका स्त्रीने घातला. तेव्हा कृतज्ञता बुद्धी जागी होऊन तिला सत्याने बहीण मानले, तिला व तिच्या घरातल्या तरण्याताठ्या लेकी सुनांना पळवून नेणे त्याला सहज शक्य असताना तिला बहीण मानले, यालाच संस्कृती म्हणतात. शाळेत शिरून सत्याने पोरांना पेढे वाटले, ममतेने तो पोरांशी व मास्तरांशी बोलला, कोणा पोरीला शाबासकी दिली कोणाला कुरवाळले तेव्हा, एक घटकाभर तरी या उग्र, अडदांड, राक्षसी मुद्रेच्या माणसाच्या मनात औदार्य, वात्सल्य, प्रेम यांची वस्ती असू शकते हे दिसून आले.
 यल्लाप्पाची मुलगी रक्मी ही सत्याची रखेली. तिनेच त्याला दगा करून पकडून दिले. असे करण्यात तिला आपण बेइमानी झालो, असे वाटले नाही. का ? 'न फसवाया मी काय त्याची बायकू हाया काय ? मी तर त्याची कडू रकेली.' यल्लप्पा कडू होता. त्याचे घराणे अस्सल नव्हते. नाहीतर तात्या म्हणाला त्याप्रमाणे रक्मी नायकाची- सत्याची- बाइल झाली असती. पण ती कडू म्हणून बाइल झाली नाही. सत्याने तिला रखेली म्हणूनच वागविली. आणि या अपमानाचा तिनेही सूड घेतला. न्यायालयात सत्यावर चोरीचा आरोप शाबित झाला. पण तो गर्जना करून म्हणाला, 'आम्ही चोर न्हाई. आम्ही परबू रामचंद्राच चाकर हाओ. रामाच चाकर म्हनुनशान आम्ही रामवंशी जालु. आमाला तुमावानी बोलता येत न्हाई. पन काळ कंदी फिरल, अन आमाला बर दिस येत्याल.' असा हा सत्या फाशी गेला. माटे म्हणतात इमानी शूर व निष्ठावंत लोकांचा सत्या पुढारी होता.
 ध्येयाकांक्षा वरिष्ठ, सुशिक्षित समाजाच्या चित्तामध्ये ज्या ध्येयाकांक्षा असतात, असू शकतात त्याच निष्ठा मांगासारख्या हीन गणलेल्या जमातींच्या चित्तातही असू शकतात, हे तारळ खोऱ्यातील पिऱ्या मांगाच्या गोष्टीवरून दिसते. ते लोक दिसायला राकट, ओबडथोबड खडबडीत, असे दिसतात. या वरच्या खडकाच्या खाली डोकावले तर तेथे निर्मळ, जिवंत पाण्याचा झरा निश्चित दिसतो. 'आमाला तुमावानी बोलता येत नाही' हे मात्र खरे आहे. म्हणून माटे यांनी ते कसे बोलतान वे सांगून त्याचा अर्थ आपण समजावून घ्यावा अशी विनंती केली आहे.
 पालीच्या खंडुबाच्या जत्रेत मांग लोकांचा भरणाच फार असतो. तो त्यांचा देव आहे. आणि मांग कुठेही कसाही फिरत असला तरी जत्रेच्या दिवशी नियमाने तेथे यावयाचा हे ठरलेले आहे. त्यामुळेच अनेक दिवस फरारी असलेले मांग गुन्हेगार तेथे त्या दिवशी सापडतील अशी पोलिसांची खात्री असते व जत्रेला तेही मोठ्या सरंजामनिशी हजर असतात. पिऱ्या मांगाने जत्रेला जाण्याची गोष्ट त्याची बायको चंद्री हिच्याजवळ काढली तेव्हा हा धोका तिला दिसल्यामुळे ती धन्याला म्हणाली, 'तुमी जत्रेला न्हाइ जावाव. सरकारी मानसं मुरदाड. तिकडं हिंडत्यात. जीव जगला

७०
साहित्यातील जीवनभाष्य