पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालत आलेल्या विशिष्ट संस्कारांनी मिळालेले स्थैर्य, सांपत्तिक खुशाली इत्यादींनी जपून धरलेल्या समाजात नांदणाऱ्या सद्गुणांची सुद्धा आपण आपल्या वाङ्मयात केवढी बडेजाव करतो? पण वर दिलेल्या गोष्टी ज्यांना लाभलेल्या नाहीत ती गरीब माणसे नेकीने वागून, परस्परांवर निष्ठा ठेवून, केवढे थोर सद्गुण दाखवितात हे "पाहिले म्हणजे माझे चित्त भरून येते. आणि त्यांच्या त्या निष्ठा वाङ्मयात स्थिर होण्याला जास्त लायक आहेत असे वाटते.'
 संस्कृतीची लक्षणे 'कृष्णाकाठचा रामवंशी' सत्या रामोशी आणि 'तारळ खोऱ्यातील पिऱ्या' यांच्या कथा तबाच्या कथेपेक्षा जास्त उद्बोधक आहेत. तबा हा प्रामाणिकपणे मोलमजुरी करून पोट भरणारा मनुष्य त्याचे जीवन गुन्हेगारीचे नाही. कायद्याच्या दृष्टीने तो एक सभ्य नागरिक आहे. त्याच्या अंतरंगात काही संस्कृति लक्षणे दिसली तर ते कौतुकास्पद आहे, हे खरे. पण सत्या व पिऱ्या यांच्या ठायी ती दिसली तर ते जास्त कौतुकास्पद, जास्त विस्मयावह आहे. कारण ते दोघे गुन्हेगार म्हणून शिक्का पडलेल्या जमातीतले आहेत आणि दरोडेखोरी हाच त्यांचा धंदा आहे. खून करणे, मुंडया मुरगळणे, हा त्यांचा रोजचा उद्योग आहे. अशा मानवजातीशी वैर धरणाऱ्या लोकांच्या ठायी काय संस्कृती असणार? असे आपल्याला वाटते. हाच गैरसमज माटे यांना दूर करावयाचा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, 'रामवंशी पुढारी सत्या हा लौकिक दृष्टया दरोडेखोर असला तरी त्याची भूमिका कित्येक वृत्तांत मोठी उदात्त अशी दिसून येईल. रामापर्यंत आपली पीठिका नेण्याची त्याची उत्सुकता हिंदुसमाजाच्या दृष्टीने फार उत्तेजक वाटते. आपण चोर नाही ही त्याची गर्जना आणि मागल्याकाळात आपण समाजात आवश्यक व उपयोगी माणसे होतो ही समाजास त्याने करून दिलेली आठवण सर्वानीच ध्यानात ठेवावयास हवी.'
 तू माजी भन इंदापूरकरांच्या वाड्यावर सत्याने दरोडा घातला तेव्हा घरधनीण सावित्री बाई पुढे झाली व 'सत्याजी, आम्हांला मारू नका, आमच्याजवळ आहे ते सगळं तुमच्या हवाली करते, पण पोराबाळांना मारू नका,' असे तिने सत्याला विनविले. सत्या तर पाहतच राहिला. बाईमाणूस अन् एवढे धैर्य ! त्याने तिचे म्हणणे मान्य केले. मग तिने सगळ्यांना आग्रहाने जेऊ घातले व शेवटी सर्वांना दूधभात वाढला. आणि जेवणे झाल्यावर घरातले दागिन्यांचे डबे सत्यापुढे आणून ठेवले. वास्तविक सत्या त्या लुटीसाठीच आला होता. पण सावित्रीबाईचें धैर्य व दिलदारी पाहून त्याचे अंतरंग जागे झाले. परिस्थितीमुळे तेथल्या संस्कृत भावनांवर चढलेली रानटीपणाची कवचे क्षणभर गळून पडली आणि तो म्हणाला, 'सावित्रीबाई, तू खरी सावित्री. आमाला दूधभात घातला. तू माजी भन हाइस. हे दागिन हव हाइती कुनाला ? देव तुज कल्यान करू. मी तुझा भाऊ आहे. वेळ वकत पडला तर हाका मार मला.'

दलित जीवन
६९