पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मैत्रीची कल्पना किती संकुचित असते ! आपल्याच रीतीभाती, आपलीच विद्या आपलेच राग लोभ यांपलीकडे आपल्याला जाताच येत नाही. ही सर्व मागे टाकून आपल्याच आकांक्षा इतर कोठे सापडतात की काय हे आपण पाहिले आहे काय ? आपल्याच वासना व ईर्षा इतर कोठे आपण शोधल्या आहेत काय ? आपलीच ध्येये आपल्या बाह्य परिवेषाच्या पलीकडे आपल्याला आढळतील, असे आपण कधी उमगतो काय ? आणि एकच माणुसकी आपल्याप्रमाणे इतरत्र कोठे सापडेल, असे. तरी आपल्याला वाटते काय ?"
 देवा, चांडाळा !  आपल्याला असे वाटले पाहिजे हेच माटे यांनी उपेक्षिताच्या अंतरंगाच्या अनेक कथा लिहून त्यांतून दाखवून दिले आहे. तबा आणि त्याची बायको मंजुळा या दोघांना दोन निरनिराळ्या ठिकाणी कामाला जावे लागत असे. पहाटे उठून दोघे घराबाहेर पडत. थोड्या वेळांतच त्यांच्या वाटा निराळ्या होत. आणि त्या अंधाऱ्या वेळी बायकोला एकटीला निर्मनुष्य रस्त्याने जावे लागते म्हणून तबाच्या जिवाची कालवाकालव होई. तबा म्हणतो, 'तरणीताठी बायको, बकाल वस्तीतून जावं लागतं; माणसांचा काय नेम सांगावा?' त्यामुळे ती दोघे एकमेकाला दिसेनाशी होईपर्यंत तीन तीनदा वळून एकमेकांकडे पहात. अन् अगदी दिसेनाशी झाल्यावर मग खिन्न मनाने पुढे जात. आणि मग तबाची काळजी वाढत जाई. सकाळी, अंधाराचे बाहेर पडायचे आणि रात्री साडेसात वाजता घरी यायचे अन मग नवरा- बायकोची गाठ पडायची. तबाची तक्रार अशी की, कधी खुशालीनं एके ठिकाणी बसायला सापडत नाही की गोडीनं बोलायला सापडत नाही. माटे म्हणतात, 'प्रेमी माणूस आपल्याला नाही म्हणून पुष्कळ लोक खिन्न असतात. पण प्रेमी माणूस असून प्रेम करावयास मिळत नाही. अशी सहस्रावधी लोकांची स्थिती असते!' तबाची अशी स्थिती होती. आणि त्याच्या जिवाला लागण्यासारखी आणखी एक गोष्ट होती. तो माटे यांना म्हणाला, 'तुमच्या पायाच्यान् सांगतो, परमेसरानं एवढा राग का केल माझ्यावर? सांचीपारनं घराला परत फिरलो मंजी सडकन तुमच्याकडची बाया मानसं अन् बापडं फिरायला निगालेली दिसत्यात, ती खुशीनं गोष्टी करत्यात, हवा खात्यात, हसत्यात. तवा माझ्या मनात येतं की आमचं जिनं बघा काय मातीच्य मोलाचं ! देवा, चांडाळा असे का केलस ?'
 हिंदुसमाजाने ज्यांना चांडाळ ठरवून टाकले आहे त्यांच्यातल्याच एकाने देवालाच चांडाळ ठरविले. आणि त्याच्या अंतरंगात वरिष्ट वर्गातल्या लोकांप्रमाणेच सर्व मृदु, नाजुक, ऋजु भाव आहे, त्याच निष्ठा आहेत, त्याच आकांक्षा आहेत हे पाहिल्यावर त्याचा हा संताप अयोग्य आहे असे म्हणावेसे वाटत नाही.
 वाङ्मयाचा विषय माटे म्हणतात, 'आपल्या वाङ्मयातून, कथांतून राजे- महाराजे श्रीमंत लोक, सुशिक्षित पांढरपेशे यांच्या जीवितातील प्रसंगांची कथानके आणि त्यांच्या सद्गुणांचे वर्णन ही वाचावयास सापडतात. संरक्षणासाठी सर्व साधने

६८
साहित्यातील जीवनभाष्य