पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निघाला आणि थेट माँटफरमील येथे गेला व थेनार्डीयरने सांगितली ती रक्कम देऊन कॉसेटला घेऊन तो पॅरिसला गेला व तेथे आडवस्तीत एक जागा घेऊन तेथे तिच्यासह राहू लागला. त्या आठ वर्षाच्या लाघवी पोरीने या वृद्ध, श्रांत गृहस्थाचे सर्व जीवन व्यापून टाकले. प्रेम, माया, स्नेह या वस्तूंची व त्याची साठ वर्षात कधी भेट झाली नव्हती. आता त्या पोरीने त्याला ते दर्शन घडविले, वात्सल्य त्याच्या चित्तातून ओसंडून वाहू लागले, आपण एका नव्या विश्वात वावरत आहो असे त्याला भासू लागले.
 पतिव्रता हळूहळू कॉसेट मोठी झाली, तिने तारुण्यात पदार्पण केले. याच वेळी बॅरन पाँटमर्सी यांचा मुलगा मॉरियस हा पॅरिसमध्ये राहून वकिली करू लागला होता. त्याची कॉसेटशी बागेत रोज गाठ पडू लागली व ती दोघे एकमेकांकडे आकृष्ट झाली. जीन व्हॅलजीन यामुळे अस्वस्थ झाला. ही आपली ठेव हा तरुण हिरावून नेणार याचे त्याला वैषम्य वाटू लागले. पण एकदा त्यांची एकमेकांना लिहिलेली पत्रे त्याच्या हाती पडली. त्यांची मने त्याला कळून आली आणि कॉसेटच्या सुखासाठीच आता तो जगत असल्यामुळे त्याने हा योग घडवून आणावयाचा असे ठरविले. तेवढयात पॅरिसमध्ये सरकार विरुद्ध बंडाळी माजली व मॉरियस बंडवाल्याचा म्होरक्या आहे, असे व्हॅलजीनला कळले. तेव्हा लगबगीने तो तिकडे गेला. तोपर्यंत मॉरियसला गोळी लागून तो पडला होता. तेव्हा पोलिसांना चुकवून मॉरियसला घेऊन व्हॅलॅजीन एका ड्रेनेजच्या विवरात शिरला व दुसरीकडच्या दाराने बाहेर पडून त्याने त्याला त्याचे आजोबा जिले नार्मंड यांचे घरी पोचविले. तेथे तो चार महिने अंथरुणावरच होता. कॉसेट तेथे जाऊन मोठ्या भक्तीने त्याची सेवा शुश्रूषा करीत असे. त्यामुळे तो बरा झाल्यावर आजोबांनी त्यांच्या लग्नाला आशीर्वाद दिला. एका बेवारशी स्त्रीची व्यभिचाराने जन्मलेली कन्या एका सरदार घराण्यात सून म्हणून आली. आणि निष्ठने, पतिप्रेमाने, विनयाने, तिने सर्वांचे आशीर्वाद मिळविले. पण तिचे पूर्ववृत्त त्या लोकांना माहीत असते तर ! त्यांनी तिला घरातसुद्धा घेतली नसती. मग त्या पोरीला रस्त्यावर यावे लागले असते. पण जीन व्हॅलजीन यांनी तिला आश्रय दिला. तिचे पूर्ववृत्त पुसून टाकले. त्यामुळे तिच्या अंगच्या गुणविकासाला संधी मिळाली. व ही पायदळी पडणारी कलिका पतिव्रता होऊन प्रभुपदाला योग्य झाली.
 ३ उपेक्षितांचे अंतरंग दलितांच्या विषयी या प्रकरणाच्या प्रारंभी जो सिद्धान्त सांगितला आहे तो प्रा. माटे यांनी 'कशाचा संसार?' नावाची तबा व मंजुळा या महार जातीच्या जोडप्याची जी कथा लिहिली आहे तीत स्वतःच स्पष्ट करून सांगितली आहे. "वाणीचा आदबशीर, मनाने सरळ, आणि दिलाचा उदार असा हा गृहस्थ केवळ जन्माच्या मुद्यावर बाजूला पडला होता. त्याच्या त्या मळकट पैरणीच्या आड स्वच्छ अंतःकरणाची भलाई नांदत होती आणि डोक्यास गुंडाळलेल्या त्याच्या भोंगळ मुंडाशाखाली समंजस बुद्धीची ऋजुता वागत होती. खरोखर आपली

दलित जीवन
६७