पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडून देण्याचा हुकूम केला. आणि तिला आपल्या इस्पितळात नेले. तेथे त्यांना तिची सर्व हकीकत समजली. त्यांनी पाचशे फ्रँक पाठवून थेनार्डीयरकडून कॉसेटला आणविण्याची लगेच व्यवस्था केली. आणि दोघींना घरी संभाळावयाचे असे त्यानी ठरविले. फँतीन पतित स्त्री होती. देह विक्रय करीत होती. आणि काँसेट अशाच संबंधातून झालेली तिचीच मुलगी. आई बेवारशी तशीच तिची कन्या ! पण माणूस मुळात चांगला वाईट काहीच नसतो. परिस्थितीने तो तसा होतो हा तर त्यांचा सिद्धान्त होता. नेटल ही वनस्पती अडाणी माणसांना विषारी तण वाटत असेल. जाणत्यांना तिचे अमृतवेलीत रुपांतर करणे शक्य होते. फँतीन व कॉसेट या वनस्पतींचे तेच करावयाचे त्यांनी ठरवले, पण माणसाने एक योजावे तर दैवाच्या मनात दुसरेच असते.
  एक दिवस बातमी आली की, जीन व्हॅलजीन नावाच्या फरारी असलेल्या डाकूला पोलिसांनी पकडले आहे. जर्व्हिस नावाच्या एका लहान मुलाचा रुपया त्याने लुबाडून घेतल्याबद्दल त्याच्यावर खटला भरला आहे. तो उद्या आरास या गांवीं चालेल व बहुधा आता व्हॅलजीनला फाशीचीच शिक्षा होईल !
 विवेक देवता पूर्वायुष्य पुसून टाकण्याचा फादर मॅडलीन यांनी किती प्रयत्न केला होता ! पण तो समंध त्यांना सोडीत नव्हता. आपल्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी निरपराध माणूस पोलीसांनी पकडला आहे. हे त्यांच्या ध्यानात आले. क्षणभर त्यांना वाटले आता आपण गप्प बसावे. तो फाशी गेला तर आपण काय करणार ? आपण तर ही फसवणूक केली नाही ना ! आपण आता शेकडो दीन जीवांना आश्रय देत आहो. आपण गेलो तर ते कोठे जातील ? तेव्हा शांत बसावे हेच बरे ! पण ते अशक्य होते. आता त्यांचा आत्मा मृदु झाला होता. आपल्या नावावर दुसऱ्या एका निरपराध इसमाला फाशी जाताना पहाणे त्यांना शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी आरासच्या न्यायालयात जाऊन त्यांनी आपणच जीन व्हॅलजीन असल्याचें जाहीर केले. त्यांच्यावर प्रथम कोणी विश्वास ठेवींना. पण अनेक पुरावे, शरीरावरच्या खुणा इ. दाखवून त्यांनी ते सिद्ध केले व ते तेथून तत्काळ निघाले. फँतीनची व तिची कन्या कॉसेट यांची व्यवस्था त्यांना करावयाची होती. पोलीस केव्हा येतील याचा नेम नव्हता. पॅरीसच्या बँकेत जाऊन त्यांनी तेथे ठेवलेले ६७ लाख फ्रँक काढून घेतले व ते जंगलात नेऊन पुरून ठेवले. व ते लगबगीने गावी परत आले. तोपर्यंत वार्ता सर्वत्र पसरलीच होती. पोलीस इन्स्पेक्टर जॅव्हर्ट तत्परतेने एम्. गावी त्यांना पकडण्यास आला होता. फँतीनला मॅडलीनना पकडले एवढेच कळले. तिला धक्का बसला व कॉसेट कॉसेट करीत तिने प्राण सोडला.
 जीन व्हॅलजीन याला तुरुंगात डांबण्यात आले. पण तेथून तो पळाला. पण पुन्हा पकडला गेला. एकदा जहाजावर असताना एका बुडणाऱ्या माणसाला वाचविण्यासाठी त्याने समुद्रात उडी मारली पण तो पुन्हा वर आलाच नाही. जीन व्हॅलजीन बुडून मेला असा त्याच्या नावापुढे शेरा पडला. व्हॅलजीन लांबवर जाऊन पाण्याबाहेर

६६
साहित्यातील जीवनभाष्य