पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मॉरियस याला दोन शेवटचे शब्द सांगताना तो म्हणाला, 'कॉसेट, तुझ्या आईचे नाव तुला आता सांगतो. तिचे नाव फँतीन होते. ते लक्षात ठेव, आणि हे बघ, तिचे जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा तेव्हा मस्तक नम्र करून तिला अभिवादन करीत जा ! तिची तुझ्यावर अपार माया होती. आणि तुझ्यासाठी तिने असह्य यातना सोसल्या होत्या. तू जितकी सुखात आहेस तितकीच ती कायम दुःखात होती. तिला नित्य आठवत जा.'
 पतितांच्या अंतरात ज्या शब्दात मॉरियस जीन व्हॅलजीनचा गौरव करीत होता त्याच शब्दात व्हॅलजीन फँतीनचा गौरव करीत होता. व्हॅलजीन व फँतीन दोघेही पतित होते. पण दोघांच्याही अंतरंगात दैवी संपदा होती. अशी असू शकते हेच कादंबरीकाराला दाखवावयाचे आहे. त्याच हेतूने त्याने कादंबरी रचली. समाजाला पतितांचे, उपेक्षितांचे हे अंतरंग दिसत नाही. मानवी जीवन ज्याला कळते त्याला त्यातली ही संपदा दिसते. आणि ती लोकांना दाखवावी या हेतूने तो साहित्य निर्माण करतो. तोच खरा ग्रंथकार, खरा द्रष्टा, खरा मानवी जीवनाचा भाष्यकार !
 स्त्रीजन्माची कहाणी  फँतीनची कथा म्हणजे स्त्रीजन्माची नित्याचीच कहाणी आहे. थोमोलिस नावाच्या तरुणावर तिने प्रेम केले. तिला गर्भ राहिला आणि मगं तो निघून गेला. कॉसेट ५/६ वर्षाची झाल्यावर फँतीन तिला घेऊन एम्. गावी निघाली. वाटेत माँट फरमील या गावी थेनार्डीयर या खानावळवाल्याकडे तिने कॉसेटला ठेवली. महिना सात फ्रँक तिच्यासाठी पाठवायचे कबूल केले व ती एम्. गावी येऊन फादर मॅडलीन यांच्या मण्याच्या कारखान्यात ती नोकरीला लागली. पण लवकरच तिच्या त्या मुलीची कथा लोकांना समजली व कारखान्यातील व्यवस्थापक बाईने काढून टाकले. फादर मॅडलीन यांना यातले काहीच माहीत नव्हते. नोकरी नाही, मुलीसाठी थेनार्डीयरकडे पैसे पाठविलेच पाहिजेत. आता काय करणार ? फँतीनवर देह विक्रय करण्याची पाळी आली. हळूहळू ती रस्त्यावर आली. तिचे रूप गेले. ती भीक मागू लागली. कारण कॉसेटसाठी पैसे पाठविलेच पाहिजेत ! शिवाय थेनार्डीयर आता निरनिराळ्या सबबी सांगून जास्त जास्त पैसे मागू लागला. हा खानावळवाला म्हणजे शुद्धः सैतान होता. कॉसेट चे तो हाल करीत असे. आणि फँतीन करून जास्त पैसे काढीत असे. ती बिचारी पोरीच्या मायेने वाटेल ते कष्ट करून पैसे पाठवीत असे. एक दिवस रस्त्यावरून अशीच हिंडत असताना एका सरदार पुत्राने चेष्टा म्हणून तिच्या पाठीवर कपड्याच्या आत बर्फ टाकले. यातना असह्य झाल्यामुळे फँतीन त्याच्यावर धावली व नखाने तिने त्याचे थोबाड ओरबाडले. आता हा केवढा गुन्हा झाला ! एका बाजारबसवीने सरदार पुत्रावर हात टाकायचा ! पोलिस इन्स्पेक्टर जॅव्हर्ट रस्त्याने चालला होता. तिला लगेच अटक करून तो तिला तुरुंगात पाठवू लागला. पण तेवढ्यात महापौर मॅडलीन तेथे आले. त्यांनी सर्व पाहिले होते. या बाईचा मुळीच अपराध नाही हे त्यांना माहीत होते. त्यांनी तिला

दलित जीवन
६५