पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गांजले यांना तो आपुले म्हणू लागला, थोड्याच दिवसात एक उदार महात्मा म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसली. सरकारने ही गावचे महापौरपद देऊन, त्याचा गौरव केला. आता गावच्या सेवेचे व्रतच त्याने घेतले. स्वखर्चाने त्याने शाळा बांधली. इस्पितळ उघडले. मोफत दवाखाना चालविला. फादर मंडलीन याची राहणी अगदी साधी होती. ते लोकात फारसे मिसळत नसत. वाचन व चिंतन यातंच सर्व वेळ घालवीत. एक दिवस ते एका शेताच्या बाजूने चालले असता शेतकरी शेतातून नेटल नावाचे गवत तण म्हणून उपटून टाकीत होते. बांधावर त्याचे ढीग पडले होते. फादर मंडलीन तेथे गेले व ते नेटल हातात घेऊन शेतकऱ्यांना म्हणाले, 'अरे हे टाकून देऊ नका. त्यांचे उपयोग आहेत. याच्या पाल्याची भाजी होते. ते वाळल्यावर त्याचे दोर होतात. त्याचा कुटा जनावरांना होतो. त्यांचे बी फार पौष्टिक आहे. थोडी काळजी घेतली की नेटलचा अतिशय उपयोग होईल. नाहीतर मात्र ते इतर पिकांना मारून टाकील. आणि हे माणसासारखेच आहे जगात निरूपयोगी किंवा वाईट वनस्पती नाही. तसाच दुष्ट किंवा नीच मनुष्य नसतो. सर्व योजकावर अवलंबून आहे. तो वाईट असला की, सर्व वाइट. तो चांगला असला की सर्व चांगले !
 व्हिक्टर ह्यूगोचे हे मानवी जीवनावरचे भाष्य आहे. माणसे मुळात नीच, पापी नसतात. परिस्थितीने ती तशी होतात. त्याचे योजक जे समाजधुरीण ते याला जबाबदार आहेत. त्या हीन, भ्रष्ट पतित लोकांना त्यांचे पूर्वायुष्य विसरून समाजाने संधि दिली तर त्यांच्यातूनच थोर महात्मे निर्माण होणे शक्य आहे. स्वतः फादर मॅडलीन हेच त्यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. बिशप सीरियलनी हे नेटल- हे तण फेकून दिले असते तर जीन व्हॅलजीन पुढील आयुष्यात अट्टल दरोडेखोर झाला असता. पण दैवी कृपेचा त्याला स्पर्श झाला व तो महात्मा झाला. स्वतः तो सत्पुरुष झाला इतकेच नव्हे तर नेटलचा सिद्धान्त ध्यानात ठेवून पतित मानवांकडे तो अशाच दृष्टीने पाहू लागला. मानव मुळात पतित नसतो. आज तो तसा दिसला तरी त्याला दयेच्या हातानी वर उचलले तर तो सत्वगुण संपन्न होऊन गहु, तांदूळ यांच्या प्रमाणेच हे नेटल ही समाजाचे पोषण करील.
 व्हिक्टर ह्यूगो फादर मॅडलीन ही व्यक्तिरेखा चित्रण येथवर हे दाखवून दिले. आत फँतीन ही दुसरी मूर्ती- दुसरे नेटल- तो आपल्याला दाखवीत आहे.
 पतिता फँतीन ही कोण होती? समाजाच्या अगदी खालच्या थरात हीन, दीन, दरिद्री अशा वर्गात जन्मलेली एक बेवारशी मुलगी आपले आई बाप कोण, हे तिला माहीत नव्हते. अशा या मुलीची कथा सांगावयाची? तीत स्वारस्य काय? तेच तर हयूगोला सांगावयाचे आहे. दैन्य दारिद्रयात, अनीतीत जन्मलेली ही बेवारशी मुलगी जन्मतःच पतित होती. तरी तिच्याही ठायी, एकनिष्ठा होती. मातेचे वात्सल्य होते. जबाबदारीची जाणीव होती. तिची मुलगी कॉसेट हिला जीन व्हॅलजीनने स्वतःच्या मुलीसारखी वाढविली. आणि मृत्युसमयी तिला व जावई

६४
साहित्यातील जीवनभाष्य