पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. पण तसे झाले नाही. बिशप मिरियलने त्याच सौजन्याने पुन्हा त्याचे स्वागत केले. आणि एक पान जास्त मांडण्यास बहिणीला सांगितले. व्हॅलजीन विस्मित झाला. त्याचा विश्वास बसेना. म्हणून त्याने बिशपांना पुन्हा पुन्हा सांगितले, 'मी गुन्हेगार आहे. नुकताच तुरुंगातून सुटून आलो आहे. तुम्हीं विचार करा. माझ्या जवळ पैसे आहेत. जेवणाचे मी पैसे देईन. पण विचार करून होकार द्या.
 'आपण बसा, जरा विसावा घ्या. जेवण तयार आहे. मग रात्री इथेच झोपा बिछाना आत्ता तयार होईल.' असे म्हणून बिशप मिरियल यांनी बहिणीला चांदीची ताटे, भांडी मांडायला चांदीची निरांजनेही लावायला सांगितले. जेवण झाल्यावर अंथरुणावर अंग टाकताच व्हॅलजीनला गाढ झोप लागली. असे जेवण, असे अंथरुण त्याला एकोणीस वर्षांत मिळाले नव्हते. सौजन्याचे दोन शब्दही त्याला या काळात दुर्मिळच होते. त्यामुळे त्याचा कडवटपणा, मानवजाती विषयीचा द्वेष जरा मवाळला होता. पण दोन वाजता जागा झाल्यावर त्याच्या डोळ्यांपुढे ती चांदीची भांडी नाचू लागली. आणि एकोणीस वर्षाची त्याच्या चित्तातली आग भडकून उठली. मनाला आलेली मवाळी सर्व नाहीशी झाली. तो उठलाच भांडी घेताना बिशप आड येणारच. म्हणून शेजारच्या खिडकींचा एक लोखंडी गज त्याने हिसक्या सरशी बाहेर काढला व बिशपांच्या खोलीत जाऊन त्याने भांड्यांचे कपाट उघडले. बिशप शांतपणे झोपले होते. बालांची निरागसता त्यांच्या मुद्रेवर होती. तेव्हा घाव घालण्याची गरज नाही. असे ठरवून व्हॅलजीनने ती भांडी पिशवीत घातली व तो पसार झाला.
 सकाळी चोरी झाल्याचे बिशपांच्या बहिणीच्या ध्यानात आले त्याविषयीच न्याहारीच्या वेळी बोलणे चालले होते. एवढ्यात व्हॅलजीनला घेऊन पोलीस आलेच. आणि तुमची चांदीची भांडी याने चोरली आहेत असे मिरियल यांना ते सांगू लागले.
 'छे छेः ! हा काही तरी घोटाळा आहे', व्हॅलजीनकडे पहात मिरियल म्हणाले. 'मी ती भांडी यांना भेट म्हणून दिली आहेत. आणि काय हो, ती चांदीची निरांजनेही मी दिली होती. ती तुम्ही का नाही नेली ? ही घ्या. ती तुमचीच आहेत. जमादार साहेब सोडा त्यांना ते चोर नाहीत. माझे पाहुणे आहेत.'
 जीन व्हॅलजीन थक्क झाला. आता पुन्हा दहा वर्षे तुरुंगवास आला, असां हिशेब त्याने केला होता. पण घडले ते त्याच्या स्वप्नाच्या पलीकडचे होते. मूढ होऊन तो उभा राहिला होता. बिशप मीरियल यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. 'भल्या गृहस्था आता ध्यानात ठेव की, तुझे पूर्वायुष्य संपले. आता तुझा मार्ग बदलला आहे वाम मार्गाने न जाता सन्मार्गाने जाण्याचे तू मला अभिवचन दिले आहेस. जा माझा तुला आशिर्वाद आहे.'
 अश्रु  बाहेर पडल्यावर दिवसभर व्हॅलजीन भ्रमिष्टासारखा हिंडतच राहिला. त्याचे मन हादरून गेले होते. आपल्याला तुरुंगात घातले असते तर बरे झाले असते, असेही एकदा त्याला वाटले. एकोणिस वर्षात काळजाचा झालेला दगड मऊ होतो

६२
साहित्यातील जीवनभाष्य