पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करूनच त्या माणसाला पोट भरावे लागते आणि मग तो कायमचा गुन्हेगार होऊन समाजाचा शत्रू होतो, समाजाच्या या प्रवृत्तीवर ह्यूगोने ला मिझरेबल्स या कादंबरीत टीका केली आहे. अमेरिकन लेखक इगरसॉल याने आपल्या 'क्राइम अगेन्स्ट दि क्रिमिनल्स' या लेखात हाच विचार मांडला आहे. अल्पशा पापासाठी अतिकठोर शिक्षा करणे हा समाजाचा गुन्हा आहे, असे तो म्हणतो. कारण यामुळे समाजातील संभाव्य दैवी संपदेचा नाश होतो. आणि त्याचे अनर्थ समाजालाच भोगावे लागतात. इंगरसॉल याने या विषयाची तात्त्विक चर्चा प्रबंध रुपाने केली आहे. व्हिक्टर ह्यूगो याने याच विषयाला मूर्तरूप देऊन त्याचे विवरण ललित पद्धतीने कादंबरीत केले आहे.
 मानवातून राक्षस जीन व्हॅजीन हा गरीब मनुष्य. स्वतःचा संसार त्याला नव्हता. तो बहिणीकडे रहात असे. तिला सात आठ मुले होती. त्यांचे वडील गेले होते. दिवसभर काबाड कष्ट करून जीन व्हॅलजीन त्या चिमण्यांमुखी कसा तरी घास घालीत असे. पण एकदा दुष्काळ पडला. तेव्हा तेही शक्य होईना. पोरे उपाशी मरू लागली. तेव्हा एका दुकानाचे दार फोडून व्हॅलजीन याने दोन पाव चोरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तो पकडला गेला. त्याला शिक्षा झाली. किती? पांच वर्षे ! दोन आण्याच्या चोरीसाठी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा त्याने तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुन्हा पाच वर्षे शिक्षा. याच तऱ्हेने एकंदर एकीणीस वर्षे शिक्षा भोगल्यानंतर व्हॅलजीन सुटून तुरुंगाबाहेर पडला. तुरुंगात गेला तेव्हा तो एक साधा लांकूडतोड्या होता. एकोणीस वर्षांनी तो बाहेर आला तेव्हा तो कोण होता? मानव जातीचा शत्रू, डाकू, राक्षस ! हे कसे घडले ? ह्यूगोनें पायरी पायरीने हे रूपांतर कसे होत गेले याचे एके ठिकाणी मोठे उद्बोधक वर्णन केले आहे. अन्याय, जुलूम, छळ असह्य यातना यांनी मनुष्याच्या मनात समाजाच्या कायद्याबद्दल द्वेष निर्माण होतो, वेळीच काही दैवी कृपाप्रसादाने त्याला आळा पडला नाही तर पुढे पुढे हा माणूस समाजाचा आणि मग मानवजातीचा द्वेष करू लागतो. आणि पुढे एकंदर सृष्टीचा तो शत्रू बनतो आणि मग काही तरी विध्वंस करावा जाळावे, पोळाके खून करावा अशी त्याची प्रकृतीच बनते. जीन व्हॅलजीन याचे हेच झाले. दिवस जाऊ लागले, वर्षे जाऊ लागली तसतसा तो आत्महीन बनत चालला, त्याच्या चित्तातले कोमल भाव वाळू लागले. त्याचे मन कडवट, कठोर, भावशून्य झाले. एकोणीस वर्षात त्याने एकदाही कोणासाठी अश्रू सांडला नव्हता !
 राक्षसातून महात्मा असा हा जीन व्हॅलजीन आयुष्याच्या अंती त्याचा जावई मारियस याला कसा दिसला? दयामृत घन सांक्षात ख्राइस्ट ! भव्य, उदात्त, उदारांचा राणा बाह्यतः कठोर, विरुप, कळाहीन दिसणाऱ्या त्या पुरुषाच्या अंतरंगांत बॅरन पॉट मर्सीच्या मुलाला- मारियसला- कशाचे दर्शन घडले ? सौम्य, शीतल अशा दयेच्या मूर्तीचे. तेथे स्वार्थ नव्हता, अहंकार नव्हता. लोक विलक्षण असे नयनसुभग असे एक तेज त्याला तेथे दिसू लागले त्याचे डोळे दिपून गेले, हे कसे घडले?

६०
साहित्यातील जीवनभाष्य