पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'तू ! तू मला धर्माधर्म शिकवतोस.' तुम्हा पशूंना धर्माधर्म कळतो होय.? यांचा भी बंदोबस्त करतो.' अगदी पिसाळून लेग्री बोलू लागला व फटक्यांनी टॉमची चामडी लोळवू लागला. 'बोल, १२०० डॉलर मी कशाला दिले ? तुझा धर्म ऐकण्यासाठी ? तू, तुझे शरीर, तुझा आत्मा सर्व मी विकत घेतले आहे की नाही ?'
 'नाही नाही, धनी. तुम्ही माझे शरीर विकत घेतले आहे. आत्म्याचा धनी परमेश्वर आहे. तो तुम्हांला कधीच विकत घेता येणार नाही. तेव्हा मी मरेन, पण असले काम करणार नाही.'
 काही दिवसांनी कॅसी व एमिलाईन या दोन स्त्रिया लेग्रीच्या मळ्यावरून पळून गेल्या. त्यांचा ठाव ठिकाणा अंकल टॉमला माहीत होता. पण लेग्रीने त्याला विचारले तेव्हा त्याने सांगण्याचे नाकारले तो म्हणाला मला ते माहीत आहे. तरी मी सांगणार नाही. त्यापेक्षा मी मृत्यू पत्करीन'
 आता लेग्रीचे पिशाच्चात रूपांतर झाले. तो जीव खाऊन अंकल टॉमला फटके मारू लागला. त्याची कातडी लोंबू लागली. तरीही, 'देवा, या लेग्रीवर दया करा, त्याला धर्म समजत नाही, त्याच्यावर दया करी' अशी प्रार्थना करीत करीतच टॉमने प्राण सोडले.
 देवाची इच्छा अंकल टॉम याला ही शक्ती कोठून आली? तत्वासाठी मरण पतकरावे हे नैतिक धैर्य म्हणजे मानवी गुणांच्या परमविकासाचे लक्षण होय. हे बळ, हे अलौकिक धैर्य टॉम याला त्याच्या धर्मनिष्ठेमुळे प्राप्त झाले होते. बायबल तो नित्यनियमाने पठण करीत असे आणि त्या धर्माचे आचरण करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत असे. पशूंना धर्माधर्म काही असणे शक्य नाही, असे लेग्रीला व बहुसंख्य गोऱ्यांना वाटत असे. निग्रोंना आपण पशूंप्रमाणे वागवतो, त्यापेक्षाही हीन गणून त्यांचा सैतानी छळ करता, हे सर्व गोऱ्यांना दिसतच होते. हे वाईट आहे असे त्यांना वाटत असते तर त्यांना मनस्ताप होऊन हळूहळू त्यांना ते बंद करावे लागले असते. पण मानव अशा वेळी अशा नीच कृत्यानाही तत्त्वज्ञानाचे रूप देतो. सौ. स्टोव्हे यानी मानवाच्या या प्रवृत्तीचे उत्तम विश्लेषण केले आहे. निग्रोंच्या छळाविषयी एका ठिकाणी काही माणसे शिळोप्याचा वाद करीत होती. एका बाईने गोऱ्या लोकांच्या क्रौर्यावर टीका केली तेव्हा दुसरी म्हणाली, 'निग्रो हे गुलामगिरीतच जास्त सुखी असतात. ते स्वतंत्र झाले तर अनर्थ होईल.' 'ते कसेही असो. पण आईबाप, मुले, पतिपत्नी यांची ताटातूट करणे हे अगदी योग्य नाही.' 'ते खरे, पण आपल्याला जशा भावना असतात तशा त्यांना नसतात. आपल्यावरून तुम्ही त्यांचा हिशेब करू नका.' पलीकडे एक भटजी बसले होते. ते म्हणाले 'ही परमेश्वराची इच्छा आहे. सर्व आफ्रिकन गुलामच असले पाहिजेत अशी देववाणीच आहे.' असे म्हणून त्यांनी बायबलमधले एक वचनही सांगितले.

५८
साहित्यातील जीवनभाष्य