पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इथेच विकून टाकू. तू एकटीने माझ्याबरोबर आले पाहिजे' अशा घरी अंकल टॉम आला होता. पण मालक उदार होते. आणि मुख्य म्हणजे त्यांची मुलगी इव्हा हिला त्याचा लळा लागला होता. ही नऊ दहा वर्षाची मुलगी म्हणजे स्वर्ग वैकुठातील या लोकी चुकून आलेली देव कन्या होती. निग्रोंच्या दुःखाने ती इतकी दुःखी होई की, 'स्वर्गात काळा गोरा, निग्रो अमेरिकन असा भेद नाही. देवाच्या पायी सर्व सारखे' असे वडिलांनी सांगितल्यापासून देवाकडे जाण्याचा तिने ध्यास घेतला. आणि खरोखरीच वर्षभरात ती मनातले निग्रोंविषयींचे गाऱ्हाणे त्या दयामृत घनाला सांगायला निघून गेली !
 हेतु प्रधान कथा 'अंकल टॉम' ही कादंबरी उघड उघड हेतुप्रधान आहे. निग्रो लोकांवर होणारा अन्याय व त्याचे दुःख हाच तिचा विषय असून सध्याच्या निर्दय हृदयशून्य व अन्याय्य पद्धतीने त्यांच्या गुणांचा विकास कसा होऊ शकत नाही हेच दाखवून समाजाच्या मनात आफ्रिकनांच्याविषयी सहानुभूती जागृत करणे हा या लेखनामागे हेतू आहे, असे लेखिकेने स्वतःच सांगितले आहे. या कादंबरीच्या अमेरिकेत १८५१-५२ या एका वर्षातच दीड लाख प्रती खपल्या. पुढील दोन तीन वर्षात इंग्लंडमध्ये दहा लाख प्रती गेल्या. नंतर तिची सर्व भाषांत भाषांतरे होऊन बायबलच्या खालोखाल ती खपू लागली. या अद्भुत यशाचे श्रेय मला वाटते, ईव्हा क्लेअर या बालिकेच्या रेखेला द्यावे लागेल. हे चित्र इतके हृदयस्पर्शी झाले आहे की, गुलामगिरी ही एक राक्षसी असुरी रूढी आहे हे कोणत्याही सहृदय माणसाला ते पाहताना वाटलेच पाहिजे, हेतुप्रधान कादंबरी लिहावी तर अशी ! प्रचार करावा तर असा !
 मी मरेन पण... ईव्हाच्या दुःखाने सेंट क्लेअर लवकरच वारले व मग अंकल टॉमला लेग्री या दक्षिणेकडल्या मळेवाल्याने विकत घेतले. तो अत्यंत क्रूर, निर्दय व हिडिस होता. कातडी फाटेपर्यंत गुलामांना फटके देणे हा त्याचा नित्यक्रम होता. एक दिवस एका मुलीला फटके मारण्याचे काम त्याने अंकल टॉमला सांगितले. मानवी जीवनातली दुःखद गोष्ट अशी की, बहुतेक वेळा दलित हेच दलिताना छळण्यात आनंद मानतात. अनेक निग्रो गुलामांना असल्या कामात आनंद वाटे. पण टॉम निराळा होता. बायबलवर व त्यांतील धर्मतत्त्वावर त्याची अचल निष्ठा होती. त्याने मुलीला फटके मारण्याचे काम आपल्याला सांगू नये, असे लेग्रीला विनविले. एका निग्रोने नकार द्यावा याचा लेग्रीला इतका संताप आला की त्याने आसुडाचा एक भयंकर प्रहार टॉमच्या तोंडावर मारला.
 'पुन्हा नाही म्हणशील ? बोल पुन्हा......'
 'होय धनी ! मी मरे मरेस्तवर वाटेल ते काम करीन. पण हे काम करणार नाही. हा अधर्म आहे. मी तो कधीही करणार नाही.'

दलित जीवन
५७