पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून तिच्या पतींला तेथे आणून त्या दोघांनाही कॅनडात पळून जाण्यास सर्वतोपरी साह्य केले. या प्रकरणाला लेखिकेने 'सीनेटरही शेवटी मनुष्यच असतो' असे नाव दिले आहे.
 निग्रो असूनही !  क्वेकर पंथीय लोकांनी एलिझा व जॉर्ज यांना प्रळून जाण्यास साह्य केले. वाटेत त्यांच्या मालकांचे लोक त्यांना पकडण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी जॉर्जने चांगला लढा दिला. आणि गोळ्या घालून त्यांना पळवून लावले. या प्रसंगी पुन्हा लेखिकेला दलितांचे अंतरंग दाखवावयाचे आहे. बायका मुलांच्या रक्षणासाठी निग्रो माणूसही प्राणावर उदार होतो, शौर्याने लढतो. इतराप्रमाणेच हेही गुण त्याच्याठायी आहेत. पण अमेरिकन गोरे लोक हे लक्षात घेत नाहीत. स्टोव्हे म्हणतात, आस्ट्रियन साम्राज्यशाहीच्या मगर मिठीतून सुटून आणि वाटेत आडविणाऱ्या त्यांच्या पोलिसांशी शौर्याने लढून हंगेरियन तरुण अमेरिकेत आले की आपण त्यांचे स्वागत करतो, त्यांच्या शौर्याची, धैर्याची वाहवा करतो. आणि तसेच शौर्य एखाद्या निग्रोने दाखविले तर? अमेरिकन गोरे लोक अर्थातच त्याला कुत्र्याच्या मोतीने मारणार ! पण त्याला पकडण्यास गेलेल्या लोकांपैकी आघाडीचे दोन लोक जॉर्जच्या गोळ्यांनी खाली कोसळले तेव्हा एकदोन गोरे लोकही विस्मित झाले. ते म्हणाले, 'अरे, हा निग्रो...! तरी अगदी निधडा आणि बेडर आहे, आश्चर्यच आहे!'
 निग्रोंच्या जीवनावर लेखिकेला हेच भाष्य करावयाचे आहे. अंकल टॉम ही व्यक्तिरेखा तिने त्यासाठीच निर्मिली आहे. पुष्कळ वेळा शेल्बी त्याच्याजवळ पैसे देऊन त्याला कामासाठी एकट्यालाच पाठवीत. त्यावेळी इतर निग्रो त्याला पळून जाण्याचा सल्ला देत. पण तो म्हणे धन्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी विश्वासघात करणार नाही. आणि हे व्रत त्याने केव्हाच सोडले नाही. त्याला शेल्बीनी विकल्याचे एलिझाकडून कळले होते. त्याची बायको त्याला पळून जाण्याचा आग्रह करीत होती. पण तो गेला नाही. 'धन्यांना मी संकटात टाकणार नाही. त्यांच्या शब्दाला बाध येऊ देणार नाही!'
 स्वर्गात भेद नाही  शेल्बीनी अंकल टॉमला विकल्यावर सेंट क्लेअर नावाच्या एका गोऱ्या जमीनदाराने त्याला घेतले. हा गृहस्थ शेल्वीपेक्षाही उदार होता. पण, त्याची बायको फार वाईट होती. ती खरी गोऱ्यावृत्तीची होती. माहेरुन सांसरी येताना तिने तेथली निग्रो मोलकरीण बरोबर आली होती. वास्तविक तिचे तेथे लग्न झाले होते, तिला मुले झाली होती. पण अमेरिकन कायदा निग्रोंना मनुष्य मानीत नसे. अर्थातच निग्रो स्त्रीला पती असतो, निग्रो पुरूषाला पत्नी असते, हे कायद्याला मान्य नव्हते. सौ. क्लेअर मोलकरणीला म्हणाल्या, 'तुला वाईट वाटायला काय झाले? मी तुला तिकडे दुसरा नवरा पाहून देईन? तेथे तुला मुले होतील. तेव्हा इथे राहण्याचा हट्ट धरू नको. आणि मुलांनाही बरोबर घेऊ नको. त्यांना आपण

५६
साहित्यातील जीवनभाष्य