पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





३ द लि त जी व न



 त्यांची दैवी संपदा दलितांचे जीवन हा जगातल्या मोठमोठया साहित्यिकांनी निवडलेला विषय आहे. आणि अशा थोर लेखकांनी दलितांविषयी लिहिलेल्या कादंबऱ्या, नाटके, लघुकथा वाचताना एक मोठी विस्मयकारक गोष्ट ध्यानात येते. जगात सर्वत्र थोर मनाची लक्षणे सारखीज दिसतात. सौ. हॅरियट स्टोव्हे यांनी अमेरिकेतील निग्रो गुलामांच्या जीवनावर 'अंकल टॉमस् केबिन' कादंबरी लिहीली आहे. दारिद्र्य जुलूम, फसवणूक यांमुळे पतित, गुन्हेगार बनलेल्या अभागी जीवाची कथा व्हिक्टर ह्यूगो याने 'ला मिझरेबल्स्' या कादंबरीत वर्णिली आहे. अस्पृश्य, आदिवासी व गुन्हेगार ठरविलेल्या जमाती यांच्यावर प्रा. श्री. म. माटे यांनी 'उपेक्षितांचे अतरंग' या नावाने लिहिलेल्या कथा प्रसिद्धच आहेत. या सर्व अभिजात लेखकांनी या दलिताचे वर्णन करताना एक मुखाने एक सिद्धान्त सांगितलेला दिसतो. ते गुलाम, ते गुन्हेगार, ते अस्पृश्य, यांचे अंतरंग समाजात उच्चपदी राहाणाऱ्या, वरच्या थरावर चढलेल्या श्रेष्ठ वर्गात गणलेल्या लोकांच्या अंतरंगाइतकेच गुणसंपन्न आहे. ध्येयनिष्ठा, त्याग, सत्यप्रेम, माया, वात्सल्य, पातिव्रत्य, दया, क्षमा ही दैवी संपदा बीजरूपाने त्यांच्याही चित्तात वरच्या वर्गासारखीच आहे. दारिद्र्य, अज्ञान, गुलामगिरी यांमुळे त्या बीजांना विकसण्यास अवसर मिळत नाही. तो मिळाला तर त्यांच्यातूनही या संपदेने संपन्न असे थोर महात्मे निर्माण होऊ शकतात. आणि मिळाला नसतानाही, बाह्यतः जरी हे लोक आसुरी संपत्तीचे वारस असे दिसत असले तरी त्यांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण केले, सहानुभूतीने, आपलेपणाने त्यांच्या अंतरंगात डोकावले तर दैवी संपदेची गंगोत्री तेथे निश्चित दिसून येते. ते अंतरंग या थोर कवींनी जगाला दाखवून दिले ही त्यांची फार मोठी सेवा होय. साहित्याची कृतार्थता कशात जर दिसून येत असेल तर ती त्याच्या या ललितकृतीत दिसून येते. साहित्याच्या क्षेत्रात जीवनभाष्याचा महिमा काय आहे ते त्यांच्या या अक्षर साहित्यावरून स्पष्ट होते.

५४
साहित्यातील जीवनभाष्य