पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जुने जग दया, उपकार, करुणा यांचे होते. नवे जग हक्क, मागणी, अधिकार यांचे आहे. यांचे दर्शन घडवून तत्कालीन जीवनावर प्रेमचंदांनी उत्तम भाष्य केले आहे.
 रायसाहेब अमरपाल सिंग यांनी एक मोठा खटला जिंकला. त्यामुळे त्यांना एक अवाढव्य, जिंदगी मिळाली. ते निवडून आले इतकेच नव्हे तर होम मिनिस्टर झाले. लठ्ठ पगार! त्यांचे आजपर्यंतचे वैरी राजा सूर्य प्रताप यांनी आपली मुलगी त्यांच्या मुलाला- रूद्रपाला देऊ केली. यापेक्षा जगात भाग्य तरी काय असते ? काही वर्षापूर्वी त्याच्या अंगात राष्ट्र भावनेचे भूत संचरले होते. त्यांनी तुरुंगवास भोगला होता. किती मूर्खपणा होता तो ! त्याच मार्गाने हे वैभव आज मिळाले असते काय ? वेळीच शहाणपणा सुचला इंग्रजांना शरण गेलो ते किती चांगले झाले ! केवढे वैभव केवढी प्रतिष्ठा केवढा मान मिळाला !
 पण या सर्वाचे फलित काय ! त्यांच्या कुळांना काही यातून लाभ झाला काय ?
 मुलगा रुद्रपाल याने राज सूर्यपाल यांच्या मुलीशी लग्न करण्याचे नाकारले. रायसिंगांनी सूर्यपालांना शब्द दिला होता. पण मुलगा ऐकेना. डॉ. मालतीबाई यांची बहीण सरोज हिच्याशी आपण आधीच लग्न केल्याचे त्याने सांगितले. केवढी अप्रतिष्ठा केवढी बेअब्रू ! रुद्रपालाने आता बापावर फिर्याद करून निम्मी इस्टेट कोर्टाकडून मिळविली व सरोजला घेऊन तो इंग्लंडला निघून गेला दुसरा धक्का आता राजा सूर्य पालांना तोंड दाखवावे कसे ! होम मिनिस्टर झाल्यामुळे मसूरी, नैनिताल, सिमला येथे बंगले बांधावे लागले. त्यात फार पैसा गेला. सूर्यपालांच्या मुलीबरोबर २|४ लाख हुंडा सहज येईल या हिशेबाने तितका खर्च आधीच केला होता. पण मुलाने तोंडघशी पाडले. आता काय करावे ? पैसा कोठून आणावा? मुलगी मीनाक्षी जावई दिग्विजय सिंग ! त्याला अफू, गांजा, दारु सर्व व्यसने होती. घरात वाटेल त्या बाया तो आणून ठेवीत असे. मीनाक्षीला आता ते असह्य झाले. जावई पिस्तुल खिशात ठेवून फिरत असे. मुलीने पोलिसांचे संरक्षण मागितले. हा खर्च कसा कोठून करावयाचा, पैसा कोठून आणावयाचा ? कर्ज, कर्ज ! होरीपेक्षाही रायसाहेब कर्जात बुडाले. पण होरीजवळ जो उपाय नव्हता तो रायसाहेबांच्या जवळ होता.
 कुळांना पिळणे ! ती कायधेनू असताना काळजी कशाची? निवडणुकी साठी कुळांवर माणशी दोन रूपये, मुलीच्या लग्नासाठी चार रुपये; सरकारी अधिकारी आले, गव्हर्नर आले; त्यांची सरबराई तर केलीच पाहिजे ! कुळावर माणशी पाच रुपये कर. नित्याचे नजराणे, भेटी, हे निराळेच.
 शेतकरी व जमीनदार यांची चित्रे ही अशी आहेत. गरिबी, दारिद्र्य, अन्नान्नदशा यांच्या इतकीच श्रीमंती, वैभव, समृद्धी ही जीवनाला मारक आहे. शेतकरी कष्ट करून पिचून जातो. जमीनदार निरुद्योगाने सडून जातो.!

भिन्न वर्गांचे जीवन
५३