पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळकती सावकाराकडे गहाण पडलेल्या असतात; पण त्यांचे खर्च मात्र कमी झालेले नसतात. कारण प्रतिष्ठा ! होरीला जशी कुळाच्या अब्रूची काळजी तशीच त्यांना मुलीच्या लग्नात लाख रुपये खर्च केलाच पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतील. मुलाला नुसती शिंक आली तरी हकीम, वैद्य, सर्जन सर्व आले पाहिजेत. देवीला अभिषेक झाले पाहिजेत, ज्योतिषांचा ताफा बोलाविला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील, हे दरिद्री आहेत. घरात हक्काची पत्नी असली तरी अनेक उपस्त्रिया त्यांनी संभाळल्या पाहिजेत. नाहीतर कुलाची प्रतिष्ठा राहणार नाही. लखनौला एक दिल्लीला एक व नैनितालला एक असे तीन प्रचंड वाडे त्यांनी ठेवलेच पाहिजेत. नाहीतर हॉटेलात उतरावे लागेल. यापेक्षा नामुष्की ती काय ?
 हे सर्व चालावयाचे तर ब्रिटिश अधिकाऱ्यापुढे लांगूल चालन केले पाहिजेत. त्यांना खाने दिले पाहिजेत. त्यांच्या शिकारीची व्यवस्था केली पाहिजे, आणि प्रत्येक पावलाला त्यांची खुशामत केली पाहिजे. त्यांच्या कपाळावर एक आठी जरी पडली तरी सर्व खलास ! या भीतीने जमीनदारांचे काळीज धडधडत असते. या सर्वांसाठी अफाट पैसा लागतो. तो कर्ज काढून मिळवावा लागतो. आणि त्यासाठी नवीन उदयास आलेला जो वरचा मध्यमवर्ग- कारखान्याचे डायरेक्टर, बँकर- विमा कंपन्यांचे चालक- त्याची सारखी पायधरणी करावी लागते. बँक मॅनेजर खन्ना, एखाद्या कुळाला बोलावे तसे रायसाहेबांना बोलतो. आणि दोन लाख रुपये कर्जाऊ मिळाले नाहीत तर तुमच्या दाराशी डोके फोडून मी जीव देईन, असे त्राग्याने रायसाहेब म्हणतात. कारण ? राजा सूर्यप्रताप निवडणुकीस उभे रहाणार आहेत. त्यांना पाडून मला ही निवडणूक जिंकलीच पाहिजे. नाहीतर विष खाण्याखेरीज अन्य मार्ग नाही ! कारण हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ! सर्व जिंदगी विकावी लागली तरी चालेल पण सूर्य प्रतापाचा पराभव केलाच पाहिजे. नाहीतर जग काय म्हणेल ?
 आणि निवडणुकीसाठी, कर्ज फेडीसाठी, मुलीच्या लग्नासाठी, गव्हर्नराच्या फंडाला दहा हजार रुपये वर्गणी देण्यासाठी पैसा कोठून आणावयाचा ? होरी सारख्या कुळांनी पिळून ! रायसाहेब हे त्यांतल्या त्यात जरा कनवाळू, उदार जमीनदार. पण त्यांची रीत काय आहे ? वेठ बिगारीने ते लोकांना सक्तीने कामाला लावतात. चपराशी सांगत आला की, वेठीने धरलेली कुळे भाकरी मागत आहेत. रायसाहेब संतापाने लाल झाले. 'त्या बदमाषांना धडा शिकविलाच पाहिजे. मागे कधीच या मजुरांना भाकरी दिलेली नव्हती. मग आता ती मागण्याचा त्यांना काय अधिकार आहे ! एक आणा रोज देतो तो देऊ. वर दमडी मिळणार नाही. काम करीत नाहीत म्हणजे काय? त्यांचा बाप काम करील?'
 राय साहेब आपल्या वडिलांची गोष्ट अभिमानाने सांगत. वडील फार उदार होते. दुष्काळात सारा, खंड ते खुषीने माफ करीत. कुळांना धान्यही वाटीत. पण कुळे त्यांना देव मानून त्यांची दया भाकीत तोपर्यंत. पण जर का त्यांनी हक्काने काही मागितले तर त्यांच्यासारखा वाईट कोणी नाही !

५२
साहित्यातील जीवनभाष्य