पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होरीने त्याची गाय मारली होती. त्याच्या घराची त्याने झडती होऊ दिली असती तर ? गोबरच्या आधारावर त्याने दातादिनाचे पैसे नाकारले असते तर ? या पायी त्याची जमीन गेली. तो मजूर झाला. त्याची मुलगी रूपा हिचे त्याने चाळीस वर्षाच्या बिजवराशी लग्न लावून दिले. त्यावेळी त्याला हुंडा देता आला नाही. त्या जावयानेच याला मदत केली. पण होरीच्या मते मुलीचा पैसा घेणे हा अधर्म होता. त्याची रुखरूख त्याला होती. मुलीचा हुंडा दिला पाहिजे. ती धर्माज्ञा होती. या जाणिवेनेच, अशक्त असतानाही, तो कंत्राटदाराच्या कामावर जाऊ लागला. आणि एक दिवस ऊष्माघात होऊन त्यातच त्याला मृत्यू आला ! होरीच्या जीवनात थोडी, अल्प, अगदी क्षुद्र अशी पण काही मूल्ये होती. ती सोडण्यास त्याची तयारी नव्हती. म्हणूनच त्याचा संसार उध्वस्त झाला. पण ज्यांना काही मूल्ये आहेत त्यांच्याच जीवनाची कथा कादंबरी होऊ शकते. प्रेमचंदांचे मानवी जीवनाचे हे तत्वज्ञान आहे.
 कादंबरीच्या अखेरीस प्रेमचंदांनी होरीच्या- भारतीय शेतकऱ्याच्या- जीवनाचा सारार्थ सांगितला आहे. तीस वर्षाच्या अखंड श्रमानंतर त्याच्या पदरी काय पडले ! आज होरी पूर्ण पराभूत आहे, पूर्ण नागवलेला आहे, भविष्याची कसलीही आशा त्याच्या चित्तात नाही. ऊन, पाऊस, थंडी यात तो सतत काबाडकष्ट करीत राहिला. पण आता त्याच्या अंगात शक्ती राहिलेली नाही. मुलीचा पैसा घेतला, मुलीला विकली हा सल त्याच्या मनात कायम आहे. त्याचा मुलगा गोबर त्याला म्हणतो, 'दादा, यात पाप ते काय ? तुम्ही काय करणार ? पीक येते ते महिनाभर सुद्धा पुरत नाही. अब्रू, प्रतिष्ठा यांचा गरिबांशी संबंध काय ? त्यातही तुम्ही सचोटी पाळलित, प्रामाणिक राहिलात. हे दैन्य दारिद्र्य त्याचेच फळ आहे. आपण जिवापाड कष्ट करतो. पण आपली मुलेबाळे उपाशी मरतात आणि दुसरे लोक मात्र आपल्या श्रमावर गवर होतात.
 जमीनदार शेतकऱ्याच्या जीवनाच्या वर्णनात जमीनदारांच्या जीवनाचे वर्णन अपरिहार्यपणे येते. हा जमीनदार हाच त्याच्या दुःखाचे प्रधान कारण आहे. बेलीफ, तलाठी, पोलीस हे सर्व त्याचे हस्तक असतात. यांच्यातर्फेच तो गरीब शेतकऱ्याला पिळून पैसा उभारीत असतो. एकेका जमीनदाराजवळ हजारो एकर जमीन असते. आणि सारा, खंड, नजराणा, वर्गणी या रूपांनी तो लाखो रुपये मिळवीत असतो. पण इतका पैसा मिळूनही त्याच्या जीवनाचे चित्र कसे आहे ? आपल्याला विस्मय वाटेल पण प्रेमचंदांनी अशा काही कौशल्याने ही दोन चित्रे एकमेकाजवळ रेखाटली आहेत की, त्या दोहोत कमालीचे साम्य दिसावे.
 दोन ध्रुवांतील साम्य प्रत्येक शेतकरी कर्जात बुडालेला असतो तसाच प्रत्येक जमीनदार कर्जाखाली वाकलेला असतो. होरीचे जमीनदार रायसाहेब अमरपालसिंग यांना सहा लाख रुपये कर्ज होते. त्यांच्या अनेक जमीमदार मित्रांच्या सर्वच्या सर्व

भिन्न वर्गांचे जीवन
५१