पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सनातन धर्म ! होरीच्या तोंडी सारखा 'धर्म' हा शब्द येतो. नशीब, कर्म, पूर्वजन्म, पुढचा जन्म यांवर त्याची श्रद्धा आहे. त्याची ही धर्मभावना हेच ब्राह्मणांचे व इतरांचे बळ आहे. हा धर्म, त्याचे ते शास्त्र ब्राह्मणांनीच सांगितलेले आहे. पण ते स्वतः आणि सर्व श्रीमंत व बलिष्ट लोक त्यातून मुक्त असतात. पंडित दातादिन याचा मुलगा मातादिन याने चांभारिण बाई ठेवली होती. स्वतः दातादिन वाटेल खोटेनाटे करतो. पण ते दोघे रोज गंगेत स्नान करतात, गंध लावतात, जप करतात. त्याना पाप लागणे शक्यच नव्हते. पटेश्वरी तलाठी कुळांना पावत्या देत नाही. आणि सारा पुन्हा पुन्हा वसूल करतो. पण तो दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो. त्याला पाप लागणे शक्य नव्हते. भोला म्हातारा झाला होता. त्याने नवी तरणी बायको केली. तिला पाहून वेलीफ नोखेराम यांनी दोघांनाही आश्रय दिला. आणि मग त्याच्या आधारे भोलाला बायको पायदळी तुडवू लागली. नोखेरामचा हा अनाचार जगजाहीर होता. पण तो ब्राह्मण होता. गंध, भस्म, जानने या कवचातून पाप आत शिरणे शक्यच नव्हते. ! धर्म छळ करणार तो फक्त गरीबांचा. ब्राह्मणांना छळणे त्याला शक्य नव्हते. कारण त्यांनीच तो निर्मिला होता. मातादिन याने चांभारीण ठेविली होती. पण त्याचा बाप दातादिन म्हणे, यात काय बिघडले ? हीन स्त्रियांशी ब्राह्मणांनी लग्ने केल्याची अनेक उदाहरणे महाभारतात आहेत ! मग मातादिन त्या सेलियाशी- चांभार मुलीशी लग्न करील काय ? छे छे! ! धर्म दर युगात पालटत असतो ! त्या काळी लोक जास्त पुण्यवान होते. त्यांना जे पचले ते आता कलियुगात आम्हाला पचणार नाही.
 मातादिनने सेलियाशी संबंध ठेवला. तिला दिवस गेले, तेव्हा तिच्या गोताचे चांभार खवळून उठले. पाच पंचवीस लोक जमा करून ते दातादिनकडे आले. म्हणाले, 'सेलियाला तुम्ही ब्राह्मण म्हणून घरात घ्या नाहीतर मातादिनाला आम्ही चांभार करू, आणि खरोखरच त्यांनी मातादिनाला जबरीने धरून त्याच्या तोंडात एक हाडूक खुपसले. आणि ते पळून गेले. दातादिनावर हा भयंकर प्रसंग होता. पण तो ब्राह्मण होता. त्याने काशीला जाऊन पाचशे रुपये खर्चून मुलाला मुक्त करून घेतले. पण पुढे मातादिनाला उपरती झाली. प्रेमचंदांना त्याच्यामार्फत स्वतःची धर्म कल्पना सांगावयाची होती. होरीच्या परसात एका खोपटात सेलिया रहात होती. तेथे मातादिन गेला व तिला म्हणाला, 'हे घर हेच माझे देऊळ आहे, मी येथेच रहाणार आहे. सर्व शहाणे लोक म्हणतील की, हाच खरा धर्म आहे !'
 होरीला हे धाडस नव्हते. तो मनाचा उदार होता. गोवरची बायको परजातीची होती. तरी त्याने तिला स्वीकारली, पण त्यासाठी गावकीचा दंड बसला तो त्याने दिला. सेलियाला आपल्या परसात त्याने राहू दिले. यात त्याचे औदार्यच दिसते. पण रूढ धर्माची चौकट मोडण्याचे धैर्य त्याला नव्हते. त्या धर्मावर त्याची श्रद्धा होती व ती खरी होती. यामुळेच त्याच्या जीवनातून कथा निर्माण होऊ शकली.

५०
साहित्यातील जीवनभाष्य