पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ब्राह्मण माहात्म्य गोवर लखनौला गेला व तेथे गिरणीत नोकरी करू लागला. त्याच्या गावी दिवसभर कष्ट करून त्याला चारसहा आणे मिळत. आता त्याला दोन रुपये रोज मिळू लागला. आणि मुख्य म्हणजे आता तो शहाणा झाला. कामगार संघटना, पुढाऱ्यांची व्याख्याने, संघ, मोर्चे यांतून कामगारांचे हक्क, भांडवलदारांनी चालविलेली पिळणूक, जमीनदारांचे जुलम, अन्याय, सर्व त्याला कळू लागले. तो चलाख झाला, हुषार झाला. व शेदोनशे रुपये घेऊन घरी आला. त्यांच्या चेहऱ्यावरची ऐट, त्याचा पोशाख, त्याची भाषा हे सर्व पाहून गावकरी जरा दबूनच गेले. दातादिन कर्जाचे पैसे मागण्यासाठी होरीकडे आला असताना होरी त्याचे पाय धरू लागला. पण गोवर एकदम पुढे झाला. तो म्हणाला, 'दादा, तुम्ही बाजूला व्हा. मी पाहतो काय ते.' पंडित दातादिनांना त्याने सांगितले, 'तुमचा हिशेब काय तो नीट सांगा, मी आता तुमचे पैसे देतो.' तीस रुपयाचे नऊ वर्षात दोनशे रुपये झाले होते. व ते ऐकून गोवर चवताळून उठताच पंडित दातादिन याला म्हणाला, 'हिशेबाने साठ रुपये होतात. फार तर सत्तर. तितके घ्या व पावती द्या. नाहीतर कोर्टात जा.' पण दातादिन कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने खरोखरच ब्रह्मास्त्र उपसले. तो होरीला म्हणाला, 'होरी, मी ब्राह्मण आहे. मला तुझे सत्तरही नको आणि मी कोर्टातही जात नाही. माझा पैसा बुडवलास तर काय होईल ते ध्यानात घे. ब्राह्मणाचा पैसा अंगावर उठेल.' हे ऐकून गोबरला काही वाटले नाही. त्याचा ब्राह्मणाच्या शापावर विश्वास नव्हता. 'हे सावकार आपला रक्तशोष करतात, त्यांना तो अधिकार नाही. आपण सर्व सारखे आहो. उच्चनीच कोणी नाही.' असे तो सारखा म्हणत असे. तो हे सर्व लखनौला शिकला होता. पण होरीची गोष्ट निराळी होती. ब्राह्मणाचे कर्ज बुडविणे ही कल्पना त्याला सहनच होत नव्हती. मारवाडी, तलाठी, ठाकुर यांची गोष्ट निराळी. पण ब्राह्मण ! त्याचा शाप ! तो चटकन उठला व दातादिनाच्या पाया पडून म्हणाला, 'महाराज रागावू नका. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुमची पैन पै परत फेडीन' नंतर मुलाकडं वळून म्हणाला 'बाबा रे, आपला धर्म आपण सोडू नये. ते ब्राह्मण आहेत. मी जिवंत असेपर्यंत त्यांना दुखविणे मला शक्य नाही.' यावर बापलेकाचे जंगी भांडण झाले आणि गोबर तणतणत निघून गेला.
 प्रतीकारशक्ती भारतीय शेतकऱ्याचे हे यथार्थ चित्र आहे. तो सर्वापुढे लाचार आहे. प्रतीकार करणे हे त्याच्या रक्तातच नाही. तो सर्वांचा दास आहे. गुलाम आहे. सावकाराचा तो गुलाम आहे, तलाठ्याचा आहे, ब्राह्मणाचा आहे, जमीनदाराचा तर निश्चितच आहे. आणि याचे कारण ? या सर्वां आधी तो अज्ञानाचा दास आहे. म्हणून रूढींचा आहे आणि म्हणूनच या सर्वांचा आहे. गोवर शहरात जाऊन थोडा शहाणा होताच त्याच्या मनाच्या या बेड्या ढिल्या झाल्या. त्याबरोबर त्यांच्या अंगी काहीशी प्रतीकारशक्ती आली ! त्यामुळे सावकार, तलाठी, बेलीफ. त्याला वचकू लागले.

भिन्न वर्गांचे जीवन
४९