पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकदम इतके खाली येतील असे त्याला वाटले नव्हते. तो म्हणाला, 'साहेब, असा त्याला अगदी मोकळा सोडू नका. आमचा काही विचार करा ना. आम्हांला दोन पैसे मिळाले तर अशाच प्रसंगी मिळायचे.' 'ठीक आहे, मग त्याला तीस रुपये सांगा. वीस मला द्या, बाकीचे तुम्ही अन् पाटील वाटून घ्या !'
 होरीजवळ तीस दमड्याही नव्हत्या. पण त्याच्यावर दया करण्यास सावकार तयार होतेच. ठाकुर झेंगुरी यांनी त्याला झाकल्या हाताने तीस रुपये दिले. घरात खायला अन्नही नसताना कर्ज काढूनही कुळाची अब्रू वाचविण्याची होरीची तयारी होती. पण धानियाची नव्हती. ती वाघिणीसारखी पुढे झाली व होरीच्या हातावर तिने फटका मारला. रुपये सगळे खाली पडले. व लाचेचा व्यवहार उघडा झाला. साहेबांचा चेहरा अगदीच पडला. पण त्यामुळे ते पिसाळून गेले. त्यानी तलाठ्याला व पाटलाला सांगितले की, अरे मला गोत्यात आणण्याचा तुम्ही हा कटच केला होता असे दिसते. तेंव्हा मी आता तुमच्या घराची झडती घेतो. नाहीतर बऱ्या बोलाने पन्नास रुपये काढा. ध्यानात ठेवा, एकेकाला मी पाच पाच वर्षे तुरुंगात बसवीन. होरी सुटून गेला व तलाठी, पाटील, सावकार फासात सापडले. त्यांना निमूटपणे पन्नास रुपये भरावे लागले !
 इन्स्पेक्टर गेल्यावर पंडित दातादिन गरजले, 'माझा शाप त्याला भोवला नाही तर नाव बदलून देईन.' साठी म्हणाला, 'काळा पैसा कधी कुणाला पचायचा नाही.' ठाकुर झेंगुरी म्हणाला, 'देवा, तुझ्या घरी न्याय नाही. पापर्म्यांना तू कसे शासन करीत नाहीस?'
 अर्थातच यांच्यापैकी कोणीही पापकर्मा नव्हता?
 माणुसकी गोबर हा होरीचा मुलगा. त्याचे या कादंबरीतले चरित्र ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगे आहे. भोला हा गवळी. त्याची मुलगी झुनिया तिचे व गोवरचे प्रेम जमले. त्यांचा संबंध आला व तिला दिवस राहिले. दोघांची जात भिन्न; लग्न होणे शक्य नव्हते. तेव्हा गोबर घाबरून पळून गेला. आणि रात्री झुनिया होरीच्या दाराशी येऊन उभी राहिली. प्रथम धानिया व होरी संतापले. या चेटकिणीनेच आपल्या मुलाला भूल पाडली, असे धानिया म्हणू लागली. ही नसती आफत आहे, असे होरीला वाटले. पण शेवटी दोघांचेही मन द्रवले व त्यांनी तिला आश्रय दिला. तिच्या पोटात त्या दोघांचा नातू होता. यामुळे त्यांचे मन कळवळले. पण हा केवढा अनाचार होता ! वर्णसंकर, कलियुग ते हेच. एखाद्या दीन अबलेवर दया दाखवणे ! हिंदुधर्माला हे मंजूर नाही. गावकीने बहिष्कार पुकारला आणि होरीने दोनशे रुपये दंड दिला पाहिजे, असे फर्माविले. पुन्हा घराण्याच्या अब्रूचा प्रश्न आला. आणि त्याचबरोबर माणुसकीचाही झुनियाला त्याने हाकलून दिले असते तर भागले असते पण काळीज इतके उलटे त्याला करवेना. या वर्षी पीक चांगले आले होते. कणगी उपसून त्याने दोनशे रुपयांची भरपाई केली.

४८
साहित्यातील जीवनभाष्य