पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरखून गेल्या. त्यांना अस्मान ठेंगणे झाले. पण शेतकरी कुटुंबातील भाऊबंदकी उतास आली. आणि तिने गायीची शोकांतिका करून टाकली. हिरा आणि शोभा हे होरीचे भाऊ. आपापली वाटणी घेऊन ते पूर्वीच वेगळे झाले होते. पण त्यांनी हाडवैर जपून ठेविले होते. होरीने गाय घेतली त्याअर्थी वाटणीच्या वेळी आपल्याला फसवून त्याने जास्त पैसा दडवून ठेवला असला पाहिजे, असे त्यानी ठरवून टाकले आणि त्याबद्दल होरीला प्रायश्चित म्हणून हिराने एका रात्री गाईला विष घातले.
 जीवनदर्शन होरीच्या गाईला हिराने विष घालून मारले या एका प्रसंगाने प्रेमचंदांनी शेतकऱ्याच्या दरिद्री, करंट्या जीवनातील सर्व धागेदोरे उकलून दाखविले आहेत. होरी, त्याचे भाऊबंद, त्याचे सावकार, चौकशी करण्यास आलेला पोलीस, गावचा तलाठी व एकंदर गावकरी यांच्या अंतरंगाचे दर्शन या प्रसंगाने उत्तम घडते. चौकशीसाठी इन्स्पेक्टर साहेब आले व त्यांनी होरीला बोलावून तुझा कोणावर संशय आहे, असे विचारले. होरीने आदल्या रात्री आपण स्वतः हिराला हे पापकर्म करताना पाहिले असे बायकोला सांगितले होते पण याविषयी एक अक्षर कोठे बोलू नकोस असे बजाविले होते. कारण हीरा त्याचा भाऊ होता. व त्याचे पाप उघडकीस आले असते तर सर्व कुटुंबाची अब्रू गेली असती. त्या अत्यंत हीनदीन दरिद्री अशा शेतकऱ्याच्या मनांत कुळाच्या प्रतिष्ठेचे काही आगळेच विचार होते. पण कुलप्रतिष्ठेचे हे तत्त्वज्ञान धानियाला मान्य नव्हते. तिने सगळ्या गावात ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापून जाऊन होरीने तिला अतिशय मारहाण केली. सर्व गावकऱ्यांदेखत बायकोला लाथा देण्यात कुलाची प्रतिष्ठा जाते असे त्याला वाटत नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी मध्ये पडून दोघांना बाजूला केले. तेवढ्यात इन्स्पेक्टर- साहेब आले. होरीने आपला कोणावरही संशय नाही असे सांगितले. तेव्हा धानिया पुढे झाली व हीरानेच हे कर्म केले असे तिने साहेबांना सांगितले, आता हीराला बोलवायचे, पण तो नाहीसा झाला होता. तेव्हा त्याच्या घराची झडती मी घेतो, असे इन्स्पेक्टर साहेबांनी जाहीर केले. पुन्हा कुळाच्या प्रतिष्ठेला धक्का ! काय घोर आपत्ती ही ! होरीच्या भावाच्या घराची झडती ! होरीला हे कसे सहन व्हावे ! त्यात सर्व घराची अब्रू धुळीस मिळणार ! हा भयंकर प्रसंग होता. त्यातून होरीला सोडविण्यास पंडित दातादिन पुढे झाले. 'हात ओला केल्यावाचून तो ऐकणार नाही, तू काही तरी ती सोय कर' असे ते होरीला सांगू लागले. खेडेगावात पोलीस धावून जातात ते याच हिशेबाने त्यांना गुन्हा शोधण्याची तळमळ नसते. त्यांना प्रकरण मिटवायाचे असते. या प्रकरणी त्याची भूक पन्नास रुपयांची होती !
 जळवा तलाठी पटेश्वरी याने साहेबाना काकुळतीने होरीच्या बाजूने सांगितले की, हा फार गरीब मनुष्य आहे. त्याने पन्नास रुपये कर्ज काढले तर पन्नास वर्षातसुद्धा त्याला ते फिटणार नाही. यावर साहेब निराश झाले व म्हणाले, 'मग अशा गरीब माणसाचा छळ करण्यात काहीच अर्थ नाही.' पण यामुळे पटेश्वरी दचकला. साहेब

भिन्न वर्गांचे जीवन
४७