पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाला 'महाराज, पाचच रुपये दिले तुम्ही.' 'पाच कुठले, दहा आहेत ते,' ठाकुर गरजले. 'घरी जाऊन नीट मोज.' 'अरे एक रुपया कर्ज दिल्याबद्दल नजराणा नको ?' 'होय महाराज.' 'एक रुपया कागद लिहिण्यासाठी, एक रुपया कागदाचा, एक रुपया व्याज, आणि एक रुपया माझी फी. पाच झाले ना ?'
 'होय महाराज !'
 'शिवाय पाच रुपये रोख, म्हणजे दहा दिले की नाही ?'
 यावर शेतकऱ्याने ते पाच रुपये ठाकुराच्या अंगावर फेकून म्हटले, 'हेही तुमच्याजवळच असू द्या. माझा हिशेब असा; एक रुपया नव्या तरुण बायकोला नजराणा, एक थोरल्या बायकोला, एक रुपया मोठ्या बायकोला विड्याला, एक धाकटीला विड्याला. हे झाले चार आणि एक रुपया तुमच्या मर्तिकाला !'
 निसर्गाचे अपत्य अशा या सावकारीत शेतकरी किती टिकणार ! प्रेमचंद म्हणतात, सावकारांचे तगादे, त्यांनी केलेल्या फिर्यादी, दिलेल्या शिव्या यांनी शेतकरी अगदी निलाजरा, कोडगा, निबर झालेला असतो. घरात अन्नान्न दशा झालेली असते, त्यांतच पाऊस डोळे वटारतों, सावकार धरणे धरतो, जमीनदार जप्ती आणतो. त्यामुळे शेतकरी लाचार झालेला असतो. अशा स्थितीत अप्रामाणिकपणा, असत्य, खोटी आश्वासने यांवाचून त्याला गत्यंतरच नसते. दोन महिन्यांनी पैसे नक्की देतो, असे तो म्हणतो तेव्हा तो जाणूनबुजून खोटे बोलत असतो. पण त्याच्या हिशेबी यात पाप नसतेच. शेतकरी जीवनाचे हे नित्याचेच लक्षण आहे. पण त्याचे दुसरेही एक लक्षण आहे. तो निसर्गाचा पुत्र आहे. निसर्ग जसा क्रूर, कंजुष, फसवा असतो तसाच उदार, दयाळ, व निःस्वार्थीही असतो. वृक्षाची फळे स्वतःसाठी नसतात, लोकांसाठी असतात. जमीन भुकेल्यामुखी घास घालते. मेघराजा तप्त भूमीला शांत, करतो. शेतकरी तसाच असतो. तो स्वार्थी कसा असेल ?
 जया अंगी मोठेपण, तयां यातना कठीण । असे तुकोबांनी म्हटले आहे. होरीच्या जीवनात हे वरचेवर दिसून येते. हे वाचताना आपल्याला विस्मय वाटेल. इतक्या हीन-दीन जीवनात, इतक्या क्षुद्र संसारात, इतक्या खालच्या पातळीवर मोठेपण ते काय असणार, असा आपल्याला प्रश्न पडतो. प्रश्न खरा आहे. चारशे रुपयांचे, कर्ज कधीही न फेडू शकणारा, पाच-दहा रुपयांसाठी सावकाराच्या पायाशी लाचार होणारा, घरात नित्य अन्नान्न दशा असणारा, असा हा होरी. याच्या जीवनात, मोठेपण संभवते तरी कसे ?
 गोमाता एक गाय घेणे ही होरीच्या जीवनाची उच्चतम आकांक्षा आहे. घरात गाय नाही म्हणजे घराला प्रतिष्ठा नाही. गाईवाचून शेतकऱ्याच्या जीवनाला सफलता नाही. म्हणून शेजारच्या गावचा गवळी भोला याच्याकडून होरीने ऐशी रूपयाला गाय आणली. अर्थात पैसे दोन वर्षांनी द्यावयाचे होते. रोख पैसा शेतकऱ्याच्या जीवनात कधीच नसतो. गाय घरात आली. धानिया, सोना, रूपा सगळ्या

४६
साहित्यातील जीवनभाष्य