पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. गोदान ही त्याच्या जीवनाची कथा आहे. त्याच्या जीवनाचा धागान् धागा मुनशींनी या कादंबरीत उकलून दाखविला आहे. किसान जीवनाचे इतके वास्तव इतके हृदयभेदक आणि इतके उद्बोधक असे चित्र जगाच्या वाङ्मयात दुसरीकडे सापडेल असे वाटत नाही.
 उत्तरप्रदेशातील लखनौ या नगरीजवळच्या बेलारी या खेड्यातला होरी हा एक शेतकरी. धानियां ही त्याची बायको आणि गोवर, सोना व रूपा ही त्याची तीन मुले. भारतात कुठेही गेलो तरी शेतकऱ्याचे हेच कुटुंब आपल्याला आढळेल इतकी होरीची कथा प्रातिनिधिक आहे. होरीला जमीन अगदी थोडी म्हणजे तीन-चार बिघेच आहे. आणि तिच्यातून जे पीक येते ते चार-पाच माणसांच्या कुटुंबाला भाकर- तुकडयालाही पुरत नाही. त्यामुळे नित्यखर्चासाठीसुद्धा होरीला कर्ज काढावे लागते. मग सण उत्सव आले, मुलींची लग्ने निघाली की कर्जाचा बोजा वाढत जातो, यात नवल नाही. त्यात भारतातला पाऊस हा सदा लहरी, सदा चंचल. कधी अवर्षण, कधी अतिवर्षण. यांमुळे सोळा आणे पीक क्वचितच हाती येते. मग सारा थकतो, खंड थकतो आणि होरी आणखी कर्जात बुडतो. त्याला कर्ज आहे ते चार-पाचशे रुपयेच आहे. पण त्याच्या संसाराच्या हिशेबावरून हे स्पष्ट दिसते की, ते होरी या जन्मी कधीही फेडू शकणार नाही. कर्जबाजारीपणा आणि शेतकरी हे भारतात पर्यायी शब्दच झाले आहेत.
 सावकार पंडित दातादिन, ठाकुर झेंगुरी व मंगरू हे गावातले मुख्य सावकार आहेत. पटेश्वरी हा तलाठी आणि नोखेरान हा जमीनदाराचा बेलीफ हेही सावकारी करतात. कायद्याचा दंड त्यांच्या हाती असल्यामुळे त्यांची सावकारी बिनघोर आहे. हे झाले मुख्य सावकार वस्तुस्थिती अशी आहे की दोन पैसे बाळगून असलेला गावातला अमुक एक मनुष्य होरीचा सावकार नाही असे होतच नाही. नित्य असे काही घडत असते की, त्याला दहा-वीस, पंचवीस-पन्नास रुपये कर्ज काढावे लागते. जुने कर्ज फिटलेले नसते, त्याचे व्याजही दिलेले नसते, त्यामुळे नवा सावकार पहावा लागतो आणि होरीच्या गळ्याभोवती आणखी एक फास आवळला जातो. हे सर्व सावकार कर्जरोखा लिहून घेण्याच्या बाबतीत दक्ष असतात; पण होरीने हप्ता दिला किंवा व्याज दिले तर त्याची पावती ते कधीही देत नाहीत. त्यामुळे आपल्याला कर्ज किती आहे, व्याज किती थकले आहे याची होरीला काही कल्पना नसते. त्याचे आणि पंडित दातादिन किंवा ठाकुर झेंगुरी यांचे हिशेब कधीच जमत नाहीत. व्याज रुपयाला बारा आणे म्हणजे शेकडा ७५ असा दर आहे. आणि कर्ज देतानाच काही व्याज सावकार कापून घेतो. अर्थात त्याची नोंद कोठेही नसते.
 बेलारी गावच्या उत्सवात एकदा खेडुतांनी सावकारी व्यवहाराची नक्कल उठविली होती. तीवरून या व्यवहाराची उत्तम कल्पना येईल. ठाकुर झेंगुरीने दहा रुपये कर्जाऊ देण्याचे कबूल केले आणि शेतकऱ्याच्या हातात पाच ठेवले. शेतकरी

भिन्न वर्गांचे जीवन
४५