पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे मॅडम देपार्कच्या धाकात होती. म्हणून ती काही बोलत नसे. पण आता तिने धीर केला. तिने जिनिव्हीला जवळ बोलावून 'तू आपल्या घरी परत जा, येथे तू सुखी होणार नाहीस,' असे सांगितले. ते ऐकून देपार्क पिसाट झाली व अद्वातद्वा बोलू लागली. पण तिचे आता कोणी मानीना. जिनिव्हीचे मत पालटले होते. तिचे मन तिला खात होतेच. त्यात आईची शेवटची इच्छा तशीच दिसली. आईने मरणापूर्वी तिच्याकडून वचनच घेतले. त्यामुळे ती मेल्यानंतर जिनिव्ही मुलांना घेऊन मार्ककडे परत गेली.
 यामुळे मार्कला पुन्हा उत्साह आला. सायमनचा भाऊ डेव्हीड, त्याचा वकील डेल्बास हा आता मेयर म्हणून निवडून आला होता. या सर्वांनी पुन्हा सायमनला पूर्ण निर्दोष ठरवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ब्रदर गॉर्जियास आता जाहीरपणे दूरान्वयाने का होईना आपण गुन्हा केल्याचे कबूल करीत होता. जेसुइट अधिकाऱ्यांविरुद्ध तो चांगलाच भडकला होता. ते त्याला आता आश्रय व पैसा देत नव्हते. त्यामुळे माझ्याइतकेच तेही गुन्हेगार आहेत असे तो सांगू लागला. अर्थात अजूनही नाक त्याचेच वर होते. तो म्हणे की, 'मी गुन्हा केला तरी धर्मगुरुंपुढे तो मान्य केला आहे व क्षमा याचना केली आहे. तेव्हा मी आता गुन्हेगार नाही. मी कोणाचे काही लागत नाही.' कॅथॉलिकांनी ज्यूरीला खाजगी रीतीने पत्र दाखविल्याचा गुन्हाही आता सिद्ध झाला होता. या सर्वांचा परिणाम होऊन सायमन पूर्ण निर्दोषी आहे असे न्यायालयात सिद्ध होऊन त्याच्यावरचा कलंक कायमचा गेला.
 सत्य आणि कल्पित ट्रूथ कादंबरी वाचताना फ्रान्समधल्या न्यायदेवतेच्या विटंबनेची कथा, रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंची गुन्हेगारी, फ्रेंच लोकांची पिसाट वृत्ती यांची एमिल झोला याने केलेली वर्णने जरा अतिरंजित आहेत, असे केव्हा केव्हा वाटते. पण त्याच सुमारास म्हणजे गेल्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समध्ये जे 'ड्रायफस प्रकरण' प्रत्यक्ष इतिहासात घडले त्यावरून ध्यानात येते की, ती सत्यकथा या कादंबरीपेक्षा दसपट भयानक आहे. निकोलस हलास याने 'कॅप्टन ड्रायफस' हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. त्याला 'फ्रेंच जनतेतील वेताळसंचार' असे दुसरे नाव त्याने दिले आहे (ए स्टोरी ऑफ मास हिस्टेरिया). त्यावरून त्याचा अभिप्राय ध्यानात येईल. या ड्रायफस प्रकरणावरूनच झोलाने ही कादंबरी लिहिली आहे. कॅप्टन ड्रायफस हा ज्यू असून तो फ्रेंच लष्करात मोठा अधिकारी होता. जर्मन वकिलातीला फ्रेंच लष्कराच्या गुप्त बातम्या दिल्या, असा त्याच्यावर आरोप आला. ते अपकृत्य मेजर ईस्टर हेझी याचे होते. पण तपास करताना डी आद्याक्षर असलेला कोणी माणूस यात असावा, अशी लष्करी अधिकाऱ्यांना शंका आली. ड्रायफस तसा होता. आणि तो ज्यू होता, एवढे पुरेसे होते. ही वार्ता आगीसारखी पसरली. आणि मग ज्यू द्वेषाने जो संचार फ्रेंच जनतेत झाला त्यात न्याय, सत्य, स्वातंत्र्य, लोकशाही सर्व जळून खाक झाले. ड्रायफसला जन्मठेप शिक्षा झाली. काही वर्षानी फेरतपासणी

४२
साहित्यातील जीवनभाष्य