पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर पुन्हा ज्यूरीने दोषी म्हणूनच निर्णय दिला. पण त्यावेळी त्याला माफी मिळाली. त्याच्या मित्रांनी पुन्हा खटपट केली. त्यात एमिल झोला हाच प्रमुख होता. 'आय ॲक्यूज' हा त्याचा लेख फ्रान्समध्ये अमर झाला आहे. त्याच्या प्रयत्नाला यश येऊन ड्रायफस पूर्ण निर्दोषी ठरला. आणि सैन्यात त्याला पहिल्यापेक्षा वरचे पदही मिळाले.
 फ्रेंच राष्ट्रीय जीवनातली हीच कथा मूळ द्रव्य म्हणून झोलाने कादंबरीसाठी घेतली. रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंच्या अंध, हेकट, शब्दप्रामाण्यवादी, कर्मकांडात्मक धर्मामुळे आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात शिरून फ्रेंच बालकांच्या मनावर ते त्याचे संस्कार करीत असल्यामुळे फ्रान्सची ही नवी पिढी अधोगामी होत आहे. सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, सहिष्णुता, लोकशाही या मूल्यांची रोमन कॅथॉलिक राखरांगोळी करीत आहेत, हे झोलाला सांगावयाचे होते. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण हे बुद्धिवादी, सत्यनिष्ठ, सुधारक, अशा शिक्षकांच्या हाती दिले तरच फ्रान्सची उन्नती होईल हा विचार त्याला मांडावयाचा होता. सत्य, न्याय यांनी जग जिंकले पाहिजे, लष्करी बळाने नव्हे, हे झोलाचे जीवनाचे तत्त्वज्ञान होते. आणि ते त्याने अनेक कादंबऱ्यांतून मांडले आहे.
 एखाद्या व्यक्तीचे जीवनाचे तत्त्वज्ञान, असे म्हणताना तत्त्वज्ञान हा शब्द शास्त्रीय अर्थाने वापरलेला नसतो. तिच्या सर्वसाधारण श्रद्धा, तिची मूल्ये असा तेव्हा भावार्थ असतो. विल्यम जेम्स हा सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता म्हणतो, 'आपल्याला आपले जीवन तत्त्वज्ञान महत्त्वाचे वाटते. पण ते पारिभाषिक शास्त्रीय अर्थाने नव्हे. जीवनाचा आपल्याला वाटणारा अर्थ, इतकीच तेव्हा विवक्षा असते. तो अर्थ आपण अभ्यास करून निश्चित केलेला नसतो. मनातल्या मनात त्याची रूपरेखा ठरलेली असते इतकेच. बाह्य जगाचे आपल्यावर होणाऱ्या संस्काराकडे पाहण्याची आपली दृष्टी इतकाच त्याचा अर्थ.'
 जीवनभाष्य-प्रधान लक्षण टी. एम्. ग्रीन याने 'दि आर्टस् अँड दि आर्ट ऑफ क्रिटिसिझम' या आपल्या ग्रंथात शेवटी साहित्याच्या व कलेच्या श्रेष्ठतेच्या निकषाची चर्चा केली आहे. गहन, मार्मिक, अत्यंत उद्बोधक असे जीवनभाष्य हेच श्रेष्ठ साहित्याचे प्रधान लक्षण, असे तो म्हणतो. प्रथम त्याने वाल्टर पेटर- या साहित्य शास्त्रज्ञाचे याविषयीचे मत दिले आहे. रम्य काव्य (साहित्य) आणि श्रेष्ठ काव्य यात पेटर फरक मानतो. त्याच्या मते काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील रचना सौंदर्यावर अवलंबून नसून त्याच्या विषयावर अवलंबून असते. काव्याच्या विषयाची व्यापकता, गाढता, त्यातील उदात्त हेतू, त्यातील मूलगामी क्रान्तिप्रेरणा, त्यातील विशाल आशावाद यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरते. डांटेचे 'डिव्हाइन कॉमेडी', मिल्टनचे 'पॅराडाइज लॉस्ट' ही महाकाव्ये, व्हिक्टर ह्यूगो याची 'ला मिझरेबलस्' ही कादंबरी, इंग्लिश बायबल या गुणांनीच श्रेष्ठ साहित्य ठरतात.' पेटरच्या या मताचा

भिन्न वर्गांचे जीवन
४३