पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सत्याग्रहाचे फळ मार्क फार निराश झाला. तो म्हणाला, 'अरेरे, माझा देश मी चांगला जाणतो असे मला वाटले होते. पण सत्य, न्याय, यांची येथे विटंबनाच चालली आहे.' मनात निराशा, बाहेरही तेच सायमनच्या मुक्ततेसाठी त्याने हळूहळू प्रयत्न चालविलेच होते. त्यामुळे धर्मगुरूंनी त्याला जीवन असह्य करून टाकले होते. रस्त्याने लोक त्याची चेष्टा करीत. त्याची नोकरीही गेली असती. पण वरचे काही अधिकारी त्याचे चाहते होते. त्यांनी त्याला थोडी बढतीच दिली. जॉनव्हिल गावाहून त्यांनी त्याची मेलिबॉइस गावी बदली केली. पण ही बढती त्याला सुखाची झाली नाही. ती सायमनचीच शाळा होती. लोकमत आता तिच्या विरुद्ध होते. तेथे प्रथम मुलेही त्याच्याशी उर्मटपणे वागू लागली. शाळेचे तपासनीसही त्याच्या चुका टिपण्याच्या मागे लागले. त्यामुळे त्याला फार त्रास होऊ लागला. पण मेलिबॉइसला आल्यावर त्याच्यावर खरे संकट आले ते निराळेच. त्याची बायको जिनिव्ही हिचे त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम होते. मार्क करतील तेच बरोबर हीच तिची श्रद्धा होती. यामुळे मार्कला तिचा फार मोठा आधार वाटे. पण मेलिबॉइसला आल्यानंतर ती वरचेवर माहेरी आजीकडे मॅदाम देपार्ककडे जाई. तेथे मार्क, त्याचा सुधारक पंथ, सायमनपक्ष, एकंदर ज्यू लोक यांच्याविषयी तिच्या मनात भयंकर विष कालविले जाई. लहानपणापासून ती त्याच संस्कारात वाढली होती. तिचे शिक्षण, कॅथॉलिक शाळेतच झाले होते. पण मार्कवरील प्रेमामुळे तिचे परिवर्तन झाले होते. पण वरचेवर आजीच्या जुनाट अंध, कर्मठ, दुराग्रही विचाराचे आघात तिच्यावर झाले. तर ही आपल्याला दुरावेल अशी भीती मार्कला वाटू लागली. जिनिव्हीलाही तशी भीती वाटत होती. आजीकडे जाताना मार्कने बरोबर यावे असे ती म्हणत असे. पण नेहमीच ते जमत नसे. आणि आजी तर त्याला पाण्यात पहात असे. त्यामुळे तो जाण्याचे टाळी. शेवटी त्याची भीती खरी ठरली. ज्यूद्वेष जिनिव्हीच्या अंगी संचरला. 'तुम्ही त्या सायमनचा पक्ष सोडून द्या' असे ती त्याला सांगू लागली. व त्याने नकार दिला तेव्हा 'तुमचे माझ्यावर प्रेमच नाही,' असे ती म्हणू लागली. आणि हाच दुरावा वाढत जाऊन ती एक दिवस मार्कला सोडून माहेरी निघून गेली. मार्कचा संसार उध्वस्त झाला. सत्य, न्याय, समता, सहिष्णुता यांच्या समर्थनाचे हे फळ. त्याला मिळाले !
 मत परिवर्तनाचे रहस्य पण मेलिबॉइसच्या शाळेत त्याने आपले काम धीराने व नेटाने चालविले होते. तो उत्तम शिक्षक होता. सत्य, बुद्धिनिष्ठा, धैर्य यांचे संस्कार मुलांच्या मनावर करण्यानेच आज उद्या समाजमनाचे परिवर्तन होईल अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे अध्यापन हा त्याचा धर्म होता. वर्गात शिकविण्याच्या ओघात तो सत्याची महती पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे. हळूहळू वाणीच्या प्रभावामुळे, तळमळीमुळे मुलांची त्याच्यावर भक्ती बसू लागली. आणि त्यातूनच एक प्रसंग असा उद्भवला की सायमनच्या निरपराधित्वाचा पुरावा मिळणे

भिन्न वर्गांचे जीवन
३९