पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राजकारण मॅजिस्ट्रेट डाइक्स हा गुन्ह्याची सर्व चौकशी करीत होता. तो भला गृहस्थ होता. सायमनवरचा आरोप उभा राहू शकत नाही, असे त्याच्या लक्षात आले होते. धर्मगुरूंचाच, फादर फिलिबिन, ब्रदर फुलजन्स, ब्रदर गॉर्जियास यांचाच त्यात हात असावा अशी शंका त्याला आली होती. पण त्याची बायको महत्त्वाकांक्षी होती, जहांबाज होती. तिने नवऱ्याला बजावले, 'ही संधी आहे. सायमनला गुंतविलात तर बढती मिळेल. नाहीतर जन्मभर या बोमंट गावीच रहाल, आणि दरिद्री रहाल. मला ते पटायचे नाही. जन्मभर इथे रहायला मी मुळीच तयार नाही. आपला विचार पहा.' बिचारा डाइक्स. बायकोचे उग्र रूप पाहून घाबरून गेला. त्याने पुरावा उभा केला.
 निवडणूक निष्ठा लेमॉराइस हा बोमंट गावचा मेयर. लोकसत्ताकाचा अभिमानी. जेसुइटांविषयी त्याला तिटकारा. मार्कविषयी आदर. मार्क त्याच्याकडे जाताच त्याने त्याचे भरघोस स्वागत केले. सायमन निर्दोषी आहे, असे आपले मतही दिले. पण सायमन पक्षाला तो उघडपणे पाठिंबा देऊ शकत नव्हता. कारण निवडणुका जवळ आल्या होत्या. तो म्हणाला, 'मार्क मी तुमच्या बाजूचा आहे. पण काही इलाज नाही. निवडणुका अगदी अंगावर आल्या आहेत. लोकमताचे वारे ध्यानात घेतलेच पाहिजेत. केवळ माझ्याच जागेचा प्रश्न असता तर मी विवेक देवतेचा आदेश मानून खुषीने ती सोडली असती. पण प्रश्न प्रजासत्ताकाचा आहे ! त्यातून मी आता वृद्ध झालो आहे. आता ध्यानात येते की, राजकारणात विवेक देवतेप्रमाणे नेहमी चालता येत नाही. निवडणुका समोर नसत्या तर मी तुम्हांला निश्चित साह्य केले असते. तुम्ही मार्सिलीकडे जा. तो तरुण आहे. निर्भय आहे. तो तुम्हांला निश्चित साह्य करील.' मार्सलीने मार्कला फार गौरवाने वागविले अभिवचनही दिले, पण एकंदर त्याच्या बोलण्याचा मार्कला भावार्थ असा दिसला की, रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत बाध येईल असे तो काही करणार नाही. दारास हा मेलिबॉइस गावचा मेयर, तोही रिपब्लिकन पक्षाचा. कॅथॉलिकांचा कडवा द्वेष्टा. पण म्युनिसिपालिटीत त्याच्या बाजूला दोनच मतांचे आधिक्य होते. या वावटळीत ती कमी झाली तर मेयरपदही जाईल. मग काय उपयोग ! तसे नसते तर, त्याच्या पक्षाचे भरघोस बहुमत असते तर ! सत्य, न्याय, स्वातंत्र्य यांच्या बाजूने तो शौर्याने लढला असता !
 न्यायदेवता? सायमनवर खुनाचा खटला भरण्यात आला. डेल्बॉस हा एक उत्तम निष्णात वकील सायमनला मिळाला होता. त्याने त्याची बाजू उत्तम मांडली. पण सर्व व्यर्थ गेले. धर्मगुरूंनी सायमनच्या सहीचे बनावट पत्र तयार केले. व खाजगी रीतीने ते न्या. मू. ग्रॅगान यांना दिले. त्यांनी ते ज्यूरीचे सरपंच जॅकिन यांना व ज्यूरीला खाजगी रीतीनेच दाखविले. हे सर्व बेकायदेशीर होते. पण ज्यूधर्मी लोकांविरुद्ध पेटलेल्या आगीत आपला बळी पडेल ही सर्वांना भीती होती. म्हणून सर्व पापे करण्यास ते तयार झाले. ज्यूरीने दोषी म्हणून निकाल दिला. सायमनला जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

३८
साहित्यातील जीवनभाष्य