पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेलिबॉइस गावी होता. त्याची बायको जिनिव्ही हिचे तेथे माहेर होते; तिची आई श्रीमती बथेंस व आजी श्रीमती देपार्क या दोघी विधवा मेलिबॉइसला रहात असत. मॅडम देपार्क ही अत्यंत धर्मांध, अतिशय हेकट, कर्मठ व दुराग्रही स्त्री होती. मार्क फ्रॉमेंट हा पहिल्यापासूनच सुधारक (फ्रीथिंकर) म्हणून प्रसिद्ध होता. त्यांमुळे जिनिव्हीचे त्याच्याशी लग्न व्हावे याला तिचा विरोध होता. पण जिनिव्हीने तो मानला नाही, म्हणून त्यांच्यावर तिचा कायमचा राग होता. मोकळ्या मनाने मार्कचे तिने कधीच स्वागत केले नाही. त्यामुळे मार्कला तेथे जाणे आवडत नसे. पण जिनिव्हीचा आजीकडे ओढा होता. तिची आई तेथेच होती. म्हणून नाखुषीने का होईना पण तो तेथे जात असे. या वेळी सुटीत बायको जिनिव्ही व मुलगी लूसी यांच्यासह तो तेथे आला होता.
 बिंदूत सिंधू आपला बालमित्र सायमन याच्या हातून आपल्या पुतण्याचा खून करण्याचे पाप घडेल हे मार्कला स्वप्नातसुद्धा खरे वाटले नाही. त्याने त्याची भेट घेतली, इतर अनेकांची भेट घेतली आणि सायमनला या संकटातून वाचविण्याचा त्याने निर्धार केला. या प्रयत्नात असताना त्याला जे अनुभव आले त्यांतूनच धर्मसत्ता म्हणजे काय, लोकशाहीचा अर्थ काय, न्यायालयांचे स्वरूप काय, सत्य, न्याय, यांचे कोणाला किती प्रेम असते, अंधश्रद्धा, रूढी, जुनाट पूर्वग्रह, यांचा जनमनावर केवढा जबरदस्त पगडा असतो, याची सम्यक् कल्पना झोलाने दिली आहे. मेलिबॉइस, जॉनव्हिल, बोमंट यांच्या परिसरातच मुख्य कथा घडत असते, पण तेवढ्या लहानशा विश्वातून सर्व फ्रान्सचे दर्शन आपल्याला घडते. आणि सूक्ष्मपणे पाहिले तर त्यातूनच अखिल विश्वातल्या मानवी मनाचेही अंतरंग समजते. बिंदूत सिंधू दाखविणे हीच साहित्यकला.
 ॲलेकझेंद्रा व एदोर्दा या दोन स्त्रिया. एकीचा मुलगा सेबस्टिन, हा सायमनच्या निधर्मी शाळेत जाई. दुसरीचा मुलगा व्हिक्टर कॅथॉलिक शाळेत जाई. मार्कला झेफेरीनच्या तोंडात कोंबलेल्या कित्त्याच्या कागदाचा शोध ध्यावयाचा होता. तो या दोघींच्या घरी गेला. प्रथम सेबास्टिन म्हणाला, 'होय, व्हिक्टरच्या हातात त्यांच प्रकारचा कित्ता भी पाहिला होता.' व्हिक्टरही प्रथम होय म्हणाला. गडबड ऐकून दोघी स्त्रिया बाहेर आल्या. मार्कने त्यांना कागदाचे महत्त्व सांगितले. आमच्या शाळेत असले कित्ते वापरीतच नाहीत असे कॅथॉलिक ब्रदर फुलजन्स याने सांगितले होते. तसे वापरतात व त्यांतलाच एक कित्त्याचा कागद झेफेरिनच्या तोंडात सांपडला हे मार्कला सिद्ध करावयाचे होते. हे सर्व ऐकताच त्या बायका घाबरल्या. त्यांनी मुलांना डोळ्यांनी दटावले, मग दोघाही मुलांनी आम्हांला काही माहीत नाही, म्हणून सांगितले. इतर विद्यार्थ्याच्या घरी मार्क गेला. त्यांच्या आई-बापांनी मुलांना उत्तरे देण्यास मनाई केली. कोणी म्हणाला, 'अहो, आम्ही गरीब माणसे, या जंजाळात सापडलो तर कुठवर निस्तरीत बसायचं ?'

भिन्न वर्गांचे जीवन
३७