पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुःखात सहभागी आहो, असे संपादकांनी लिहिले होते. त्यावेळी त्याच्याविषयी संशय घ्यावा असे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. पण सायमन ज्यू होता आणि कॅथॉलिक धर्मगुरु ज्या निधर्मी शाळांचा भयंकर द्वेष करीत अशा एका शाळेत शिक्षक होता, हे पुरेसे नव्हते काय ?
 पिसाट फ्रेंच ! अगदी पुरेसे होते. फ्रेंच लोकांची सदाचंचल, पिसाटमनोवृत्ती, त्याच वेळी ज्यूद्वेषाची पसरत चाललेली- मुद्दाम पसरविण्यात आलेली लाट- आणि कॅथॉलिक जेसुइट पंथीय धर्मगुरुंची पाताळयंत्री कारस्थानी वृत्ती या त्रिवेणी संगमात सायमन ज्यू असणे हे अगदी पुरेसे होते. कॅथॉलिक धर्मगुरूंनी हे जाणले की, ब्रदर गॉर्जियासचा गुन्हा उघडकीस आला तर पंथाला व त्याच्या शाळांना मोठा हादरा बसेल. म्हणून त्याला पाठिशी घालून सायमनच्या ज्यूपणाचा फायदा घेऊन त्याला बळी द्यावयाचे त्यांनी ठरविले. त्यांनी हळूहळू कुजबूज सुरु केली, बोमंटाइस या वर्तमान पत्राला वश करून घेतले आणि थोडक्या अवधीत सायमन आणि ज्यू यांच्याविरुद्ध एवढा प्रक्षोभ माजविला की, सगळा फ्रेंच समाज भडकून गेला. सर्वत्र 'ज्यू मुर्दाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या. ज्यूंना लहान मुलांची काळिजे लागतात, म्हणून ते नेहमीच असे खून करतात, त्यांनी एक मंडळ स्थापून कोट्यावधी रुपये जमविले आहेत व ते फ्रान्सचा सर्वनाश करणार आहेत, अशा वदंता सर्वत्र पसरल्या आणि मेलिवॉइस, बोमंट या गावच्या आसमंतातील फ्रेंच जनता पिसाट होऊन संतापाने थरथरू लागली. अशा स्थितीत सत्य माहीत असले तरी ते सांगण्याची हिंमत कोण करणार ?
 पण अशा स्थितीतही सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहील, त्याच्या समर्थनार्थ सर्वस्व अर्पण्यास जो तयार असेल, आणि दीर्घ प्रयत्नाने अविश्रांत श्रम करून, अनेक प्रमाणे उभी करून, लोकमताची पर्वा न करता जो सत्याची प्रस्थापना करील तोच खरा शूर, तोच खरा राष्ट्राचा, फ्रान्सचा हितकर्ता होय हाच संदेश 'ट्रूथ' या कादंबरीत झोला याला द्यावयाचा आहे. आणि मार्क फ्रॉमेंट ही व्यक्तिरेखा निर्मून तिच्या चरित्राच्या द्वारे त्याने तो दिला आहे.
 धीर पुरुष मार्क फ्रॉमेंट हा एक प्राथमिक शाळा शिक्षक. प्राथमिक शाळेतील शिक्षणावर, तेथे बालबालिकांच्या मनावर जे संस्कार केले जातात त्यांवर देशाचे भवितव्य अवलंबून असते, असे झोलाचे मत आहे. यासाठीच रोमन कॅथॉलिक पंथाच्या भ्रष्ट, अधोगामी, सत्यहीन, अंध अशा धर्माच्या विरुद्ध झगडण्यासाठी त्याने एक प्राथमिक शिक्षक उभा केला आहे. सत्याचे, न्यायबुद्धीचे, बुद्धिवादाचे संस्कार हे त्याच्या हातातले शस्त्र आहे. त्या शस्त्राने जेसुइटांच्या व पोपच्या प्रचंड शक्तीशी त्याला लढा करावयाचा आहे.
 मार्क हा मेलिबॉइस येथून पाच-सहा मैलांवर असलेल्या जॉनव्हिल या गावच्या शाळेतील शिक्षक. सायमनचा बालमित्र. झेफेरिनचा खून झाला त्या दिवशी तो

३६
साहित्यातील जीवनभाष्य