पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निधर्मी पंथाच्या शाळेत घडलेल्या एका भीषण प्रसंगापासून या कादंबरीतील कथेला प्रारंभ होतो. या शाळेत सायमन नावाचा एक ज्यूधर्मी शिक्षक होता. त्याचा पुतण्या झेफेरिन हा त्या शाळेत विद्यार्थी होता. त्याने कॅथॉलिक धर्म स्वीकारला होता. तो शाळेच्या वसतीगृहातच रहात असे. ऑगस्ट महिन्यात एका सकाळी तो आपल्या खोलीत मृत स्थितीत पडलेला आढळला. त्याचा खून झाला होता. कॅथॉलिक शाळेतील ब्रदर गॉर्जियास याने हा खून केला होता. आदल्या रात्री साडे दहाच्या सुमारास गॉर्जियास तिकडून येत असताना त्याला झेफेरिनची खोली उघडी दिसली. आंत दिवा होता. त्याच्या प्रकाशात त्या सुकुमार लहान बालकाचे रूप लावण्य पाहून गॉर्जियासच्या वासना भडकल्या. हे जेसुइटपंथी लोक निसर्गविरुद्ध अविवाहित जीवन जगतात. त्यांच्या पंथाची तशी शपथच असते. त्यामुळे त्यांच्या हातून असे अनैसर्गिक गुन्हे नेहमी घडतात. फ्रान्समधील 'कीपर ऑफ दि सीलस, ' या अधिकाऱ्याच्या अहवालात त्यांची नोंद आढळते. पण बहुतेक वेळा हे किळसवाणे गुन्हे कॅथॉलिक चर्च दडपून टाकते. ब्रदर गॉर्जियास याच्या बाबतीत हेच घडले.
 गॉर्जियासच्या अत्याचारामुळे झेफेरिन ओरडू लागला तेव्हा त्याने खिशातला रुमाल काढून त्याच्या तोंडात बोळा घातला आणि तरी त्यांच्या किंकाळ्या थांबेनात तेव्हा त्याने मुलाचे नरडे दाबून त्याचा निकाल लावला व तो पळून गेला. पण झेफेरिनच्या तोंडात बोळा कोंबताना त्याच्या खिशात त्याच्या शाळेच्या कित्त्याच्या वहीचा एक कागद होता तोही त्यात कोंबला गेला. कागदाच्या एका कोपऱ्यात कॅथॉलिक शाळेचा शिक्का होता. व त्याखाली गॉर्जियासची आद्याक्षरेही होती. पण कागद कोंबला गेला आहे हे त्याच्या ध्यानात न आल्याने तो तसाच पळून गेला.
 सायमन ज्यू होता फादर फिलिबिन व ब्रदर फुलजन्स हे कॅथॉलिक धर्मगुरु व कॅथॉलिक शाळेचे चालक सकाळी त्या बाजूने चालले असता त्यांना ही वार्ता कळली. ते लगेच झेफेरिनच्या खोलीत गेले. त्याच्या तोंडातील बोळा बाहेर काढताच फादर फिलिबिन याला तो कित्त्याचा कागद दिसला. त्याच्या कोपऱ्यातील कॅथॉलिक शाळेचा शिक्का व गॉर्जियासची सही पाहताच त्याच्या सर्व प्रकार ध्यानी आला. तेव्हा मोठ्या चलाखीने, दहापांच लोक भोवती होते, त्यांची नजर चुकवून त्याने तो कोपरा फाडून खिशात घातला व सहीची अक्षरे बोळून टाकली. त्यानंतर पोलीस आले. रीतसर चौकशी सुरू झाली. सायमन वरच्या मजल्यावर रहात होता. त्याची बायको राशेल हिची व त्याची साक्ष झाली. आपण रात्री बाहेर गेलो होतो, बारा वाजता परत आलो, आपल्याला यातले काही माहीत नव्हते, आता सकाळी कळले, असे त्याने सांगितले. सायमन अतिशय भला मनुष्य होता. उत्तम शिक्षक म्हणून त्याची कीर्ती होती. चौकशीची हकीकत नजीकच्या जिल्ह्याच्या गावी निघणारे पत्र 'ला पेटिट बोमंटाइस' यात दुसऱ्या दिवशी आली तेव्हा त्यात त्याचा गौरव करण्यात आला होता. त्याच्या पुतण्याचा खून झाला, या आपत्तीत आम्ही त्याच्या

भिन्न वर्गांचे जीवन
३५